१ जूनपासून बदलणार क्रिकेटचे ‘हे’ नियम; तिन्ही फॉरमॅटमध्ये पाहायला मिळणार नवा रोमांच!

ICC Announces New Cricket Rules : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पुढील जून महिन्यापासून काही नवीन नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसोबतच टी-२० सामने अधिक रोमांचक होईल. एकदिवसीय सामन्यांमध्ये २ नवीन चेंडू वापरण्याव्यतिरिक्त, सीमारेषेवर घेतलेल्या झेलच्या नियमांमध्ये बदल केले जात आहेत आणि त्याचबरोबर कन्कशन सब्स्टिट्यूट नियमातही बदल केले जात आहेत. नियमांमधील बदलांचा सर्वात मोठा परिणाम एकदिवसीय स्वरूपात दिसून येईल ज्यामध्ये गोलंदाजांना अधिक फायदा होईल.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांत फलंदाजांचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून येत आहे. दोन्ही टोकांवर दोन नवीन चेंडूंचा वापर केल्याने गोलंदाजांना रिव्हर्स स्विंग मिळवणे कठीण झाले आहे. क्रिकबझच्या अहवालानुसार, आयसीसीने एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन चेंडूंच्या वापरासंदर्भात नियमात बदल केला आहे. नव्या नियमांनुसार, पहिल्या १७-१७ षटकांसाठी दोन चेंडूंचा वापर होईल, परंतु ३५व्या षटकानंतर फक्त एकाच चेंडूचा वापर केला जाईल.
गोलंदाजांना शेवटच्या षटकांमध्ये रिव्हर्स स्विंग मिळवण्यास मदत होईल, ज्यामुळे फलंदाजांसाठी जलद गतीने धावा करणे काहीसे कठीण होईल. ३५व्या षटकापासून कोणत्या चेंडूचा वापर करायचा, हा निर्णय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा कर्णधार घेईल. जर सामना काही कारणास्तव २५ किंवा त्यापेक्षा कमी षटकांचा खेळला गेला, तर अशा परिस्थितीत फक्त एकच चेंडू वापरला जाईल. हा नवा नियम २ जुलैपासून श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेपासून लागू होईल.
हेही वाचा – ‘संभाजी महाराजांच्या नावाने लव्ह जिहादचा कायदा करा’; गोपीचंद पडळकर यांची मागणी!
फिल्डिंगच्या सतत सुधारत जाणाऱ्या स्तरामुळे आता बाउंड्री लाइनवर असे कॅच घेतले जात आहेत, ज्याचा यापूर्वी विचारही केला जात नव्हता. मात्र, काही वेळा अशा परिस्थिती उद्भवतात ज्यामुळे काही निर्णयांवर खेळाडूंमध्ये नाराजी दिसून येते. याच पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बाउंड्री लाइनवरील कॅच तसेच डीआरएस (डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम) नियमांमध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील सविस्तर माहिती लवकरच जाहीर केली जाईल.
आयसीसीने कन्कशन सब्स्टिट्यूट नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या नियमांनुसार, आता प्रत्येक संघाला सामना सुरू होण्यापूर्वीच कन्कशन रिप्लेसमेंटसाठी पाच खेळाडूंची नावे सामना रेफ्रीकडे सादर करावी लागतील. यामध्ये एक यष्टीरक्षक, एक फिरकी गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू, एक फलंदाज आणि एक वेगवान गोलंदाज यांचा समावेश असणे आवश्यक आहे.
सामन्यादरम्यान एखाद्या खेळाडूला कन्कशनमुळे (मेंदूला झटका बसल्याने) बाहेर जावे लागल्यास, त्याच्याच प्रकारच्या दुसऱ्या खेळाडूलाच संघात स्थान मिळेल. हा नियम कसोटी क्रिकेटमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या अंतिम सामन्यानंतर लागू होईल. हा बदल श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात १७ जूनपासून सुरू होणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपासून प्रभावी होईल.