Narendra Modi | ‘काँग्रेसने स्वत:च्या फायद्यासाठी वक्फचे नियम बदलले’; नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

PM Narendra Modi | वक्फ (सुधारणा) विधेयक नुकतेच लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर होऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संमतीने कायद्यात रूपांतरित झाले आहे. या कायद्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गेले काही महिने तीव्र वादविवाद सुरू होते. दरम्यान, आज हरियाणातील एका सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेसने स्वतःच्या फायद्यासाठी वक्फ नियमांमध्ये बदल केले आणि संविधानाला सत्ताप्राप्तीचे साधन बनवले. त्यांनी केवळ मुस्लिम कट्टरपंथीयांचे तुष्टीकरण केले. नव्या कायद्याला त्यांचा विरोध हेच दाखवतो. काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष मुस्लिम व्यक्ती का बनवत नाही? तसेच निवडणुकीत ५० टक्के तिकिटे मुस्लिम उमेदवारांसाठी का राखीव ठेवत नाही? असे सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला केले.
हेही वाचा : भारतातील पहिले ‘संविधान भवन’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित!
संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष त्यांच्या सरकारला प्रेरणा देते. प्रत्येक निर्णय आणि धोरण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित आहे. पण विरोधी पक्षाने (काँग्रेसने) सत्ता मिळवण्यासाठी संविधानाला एक साधन बनवलं. आणीबाणीच्या काळात काँग्रेसने सत्ता टिकवून ठेवण्यासाठी संविधानाला चिरडण्याचा प्रयत्न केला. उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यात आला. पण दुर्दैवाने काँग्रेस यालाही विरोध करत आहे, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली.
पंतप्रधानांनी काँग्रेसवर आरक्षणाच्या मुद्द्यावरही प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, काँग्रेसने कधीच तपासले नाही की आरक्षणाचे फायदे एससी, एसटी आणि ओबीसी समुदायांपर्यंत पोहोचले की नाही. बाबासाहेबांनी संविधानात स्पष्ट सांगितले की धर्माच्या आधारावर आरक्षण नसावे, पण काँग्रेसने स्वार्थासाठी वक्फ नियमांमध्ये बदल केले, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.