देशात सर्वाधिक वाहतूक कोंडीची ‘ही’ शहरे… पहिल्या १० शहरांमध्ये पुणे, मुंबई…

पुणे : महापालिका निवडणुकीत सर्वाधिक चर्चेचा मुद्दा ठरलेल्या वाहतूक कोंडीत पुण्याने आपले स्थान ‘अबाधित’ राखले आहे! संथ वाहतुकीत शहराने देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. ‘टॉमटॉम’ संस्थेच्या २०२५ या वर्षासाठी केलेल्या अभ्यासातून हे चित्र स्पष्ट झाले असून, कोंडीची समस्या दूर करणे हे पुण्याच्या नव्या कारभाऱ्यांपुढील आगामी पाच वर्षांतील सर्वांत मोठे आव्हान ठरणार आहे.
‘टॉमटॉम’च्या अहवालानुसार, पुण्यातील वाहनचालकांना दहा किलोमीटर अंतर पार करण्यासाठी ३३ मिनिटे २० सेकंदांचा कालावधी लागतो, तर गर्दीच्या कालावधीत (पीक अवर) शहरात वाहनांचा वेग १५.१ किलोमीटर प्रतितास असल्याचेही या संस्थेने केलेल्या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.
‘टाॅमटाॅम’ ही संस्था दर वर्षी जागतिक पातळीवरील वाहतुकीचा अभ्यास करते. सन २०२५ च्या अहवालानुसार, मेक्सिको सिटी जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडीचे शहर ठरले आहे. दुसऱ्या क्रमांकावर भारतातील बेंगळुरूचा समावेश आहे. देशपातळीवर बेंगळुरू अव्वल स्थानी आहे. त्यापाठोपाठ पुणे दुसऱ्या क्रमांकावर असून, मुंबई तिसऱ्या स्थानावर आहे.वाढते नागरीकरण, वाहनांची वाढती संख्या, अरुंद रस्ते, रस्त्यांवर वाढलेली अतिक्रमणे, नियोजनाचा अभाव यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान केंद्र आणि राज्य सरकार तसेच स्थानिक प्रशासनाने याबाबत शास्त्रोक्त पद्धतीने कार्यवाही करण्याची मागणी केली सामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीजास्त वापर करण्यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत नागरिकांना त्याकडे वळविणे महत्वाच आहे. अन्यथा भविष्यात शहराच्या आर्थिक, सामाजिक, पर्यावरणीय, सांस्कृतिक विकासावर मोठा परिणाम होईल, अशी भीती वाहतूक तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
‘टाॅमटाॅम’ संस्थेने २०२४ मध्ये जागतिक पातळीवरील केलेल्या अभ्यासानुसार, मंद वाहतुकीच्या शहरांमध्ये पुणे शहर चौथ्या क्रमांकावर होते. यंदा त्यात किंचित सुधारणा झाली असून, पुणे शहर पाचव्या स्थानी पोहोचले आहे. जागतिक पातळीवर पुण्यातील सरासरी वाहतूक कोंडीचा स्तर ७१.१ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे.
देश पातळीवर सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेली पहिली १० शहरे
१ बेंगळुर
२ पुणे
३ मुंबई
४ नवी दिल्ली
५ कोलकाता
६ जयपूर
७ चेन्नई
८ हैदराबाद
९ एर्नाकुलम
१० अहमदाबाद




