महाराष्ट्राच्या दोन्ही खो-खो संघांचा विजयारंभ! उद्घाटनात महाराष्ट्राचे शानदार संचलन
३८वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : महिला व पुरूष संघांनी यजमान उत्तराखंडाला नमवले

हल्दवानी : गतविजेत्या महाराष्ट्राच्या महिला व पुरूष खो-खो संघांनी आपल्या लौकिकास साजेसा खेळ करीत ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अपेक्षेप्रमाणे विजयारंभ केला. महाराष्ट्राच्या महिला संघाने सलामीच्या लढतीत यजमान उत्तराखंडचा ३७-१४ असा २३ गुण व १ डाव राखून धुव्वा उडविला, तर पुरूष संघानेही उत्तराखंडला ३७-२२ असे १५ गुण व एक डावाने हरविले.
गौलापूर येथील इंदिरा गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये मंगळवारपासून खो-खो स्पर्धा सुरू झाली. प्रियांका इंगळे हिच्या अष्टपैलू खेळामुळे (२.२० मिनिटे नाबाद व २.१० मिनिट संरक्षण व ८ गुण) महिला संघाने उत्तराखंडवर ३७-१४ असा २३ गुण व १ डाव राखून दणदणीत विजय मिळविला. आश्विनी शिंदे (२.३०मि.) व सानिका चाफे (२.२० मिनिटे) यांनी प्रियंकाला संरक्षणात तोलामोलाची साथ दिली. उत्तराखंडची कर्णधार भारती गिरी हिने एक मिनिटे संरक्षण करीत तगड्या महाराष्ट्राला एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा – प्रजासत्ताक दिनानिमित्त इंद्रायणीनगरमध्ये ३५० फुट तिरंगा रॅली
पुरुष गटातही महाराष्ट्राने उत्तराखंडला ३७-२२ असे १५ गुण व एक डावाने नमविले. यात रामजी कश्यपने अष्टपैलू खेळ करताना आपल्या धारदार आक्रमणात ८ गडी बाद करीत संरक्षणात १.४६ मिनिटे पळतीचा खेळ केला. अनिकेत चेंदवणकरने २.१० मिनिटे संरक्षणाची बाजू सांभाळली. उत्तराखंडकडून पिन्स कश्यप व राहूल शर्मा यांनी प्रत्येकी ६ गडी बाद करीत सामन्यात रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
इतर निकाल : पुरुष : ओडीसा विजयी विरुद्ध छत्तीसगड ४३-३४, ९ गुण व ६.२५ मिनिटे राखून.
महिला : ओडीसा वि.वि. तामिळनाडू ३६-१८, १८ गुण व एक डावाने.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
महाराष्ट्राचे शानदार संचलन
३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात मंगळवारी महाराष्ट्राच्या २० खेळाडू, संघटकांसह शानदार संचलन केले. राजेशाही फेटा परिधान करीत महाराष्ट्राच्या पथकाचे लक्षवेधी संचलन झाले. जागतिक पदक विजेती महिला तिरंदाज आदिती स्वामी व जगज्जेत्या भारतीय खो-खो संघाचा कर्णधार प्रतिक वाईकर यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचा ध्वज फडकविला. संचलनात १५ खेळांडूसह पथकप्रमुख संजय शेटे, उपपथकप्रमुख उदय डोंगरे, सुनील पूर्णपात्रे, स्मिता शिरोळे व खजिनदार धनंजय भोसले सहभागी झाले होते.