‘राज्यावर कर्जाचा डोंगर, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्याने आर्थिक गणित बिघडले’; नाना पटोले

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी २०२५- २६ चा अर्थसंकल्प जाहीर केला. या अर्थसंकल्पात अनेक घोषणा करण्यात आल्या. मात्र, विरोधकांनी आजच्या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली आहे. राज्यावर कर्जाचा डोंगर असून उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्याने आर्थिक गणित बिघडले आहे. महसूली तूट आणि राजकोषीय तूट वाढली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणा पूर्ण होणार की नाही या बाबत साशंकताच आहे, असं काँग्रेस नेते नाना पाटोले यांनी म्हटलं आहे.
नाना पटोले म्हणाले, महायुतीने राज्याची अधोगती केल्याचे आर्थिक पाहणी अहवालातूनच समोर आले होते. आज अर्थसंकल्पातून सरकारने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. राज्यावर कर्जाचा डोंगर असून उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्याने आर्थिक गणित बिघडले आहे. महसूली तूट आणि राजकोषीय तूट वाढली आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या घोषणा पूर्ण होणार की नाही या बाबत साशंकताच आहे.
प्रसिद्धीसाठी फक्त घोषणा केल्या जात आहेत. केंद्रातल्या मोदी सरकारप्रमाणे २०४५ मध्ये महाराष्ट्र विकसित होईल, २०३० पर्यंत सर्वांना घर मिळेल अशा पोकळ घोषणा करण्यात आल्या आहेत. पण विधानसभा निवडणुकीत दिलेले आश्वासनांपैकी एकही आश्वासन या सरकारने पूर्ण केले नाही, असंही काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा – ‘विकसित महाराष्ट्र साकारणारा लोकाभिमुख अर्थसंकल्प’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहिणींना २१०० रुपये, शेतक-यांची कर्जमाफी या घोषणा होतील अशी जनतेची अपेक्षा होती. ही आश्वासने देऊन महायुतीने जनतेची मते मिळवली होती. पण आज त्यांची फसवणूकच सरकारने केली. महागाई, बेरोजगारी या अत्यंत महत्वाच्या विषयांवर अर्थसंकल्पात काही निती, ठोस कृती कार्यक्रम नाही. त्यामुळे सरकार या प्रश्नांवर गंभीर आहे असे दिसत नाही. मुंबई, ठाणे आणि पुणे याच्यापलिकडच्या महाराष्ट्रासाठी मराठवाडा विदर्भातल्या ग्रामीण भागासाठी या अर्थसंकल्पात काहीच नाही. राज्याच्या भविष्यासाठी जनतेच्या हितासाठी काही ठोस घोषणा कोणताही रोडमॅप नसलेला हा दिशाहीन अर्थसंकल्प असल्याचे नाना पटोले म्हणाले.
अर्थसंकल्प हा शेतकरी, महिलांसह सर्वसामान्यांचा विश्वासघात करणारा, कोणतीही दिशा, ध्येय, धोरण नसलेला पोकळ अर्थसंकल्प आहे. यातून कोणत्याही घटकाला काहीही फायदा होणार नाही. निवडणूकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता सरकारने राज्यातील जनतेचा विश्वासघात केला आहे. राज्यात आर्थिक बेशिस्तीचा कारभार सुरु असून आठ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज झाले असून उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही म्हणणारे भाजपा युती सरकार राज्याला कर्जबाजारी करून देशोधडीला लावणार असेच दिसते आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.