तळेगाव येथील किशोर आवारे यांच्या हत्येचा ‘मास्टरमाईंड’ पोलीसांच्या ताब्यात; गुंडा विरोधी पथकाने केली नाशिकमधून अटक
![Talegaon, Kishore Aware, Murder, 'Mastermind', Police custody, Anti-Gundam Squad, Arrested from Nashik,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/Vishwanath-Khale--780x470.png)
पिंपरी:
तळेगाव येथील जनविकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्येचा मास्टरमाईंड चंद्रभान विश्वनाथ खळदे याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. गुंडा विरोधी पथकाने नाशिक येथून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
दि.१२ मे २०२३ रोजी जनविकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयाच्या आवारात निर्घृण हत्या झाली होती. शाम अरुण निगडीकर, प्रविण ऊर्फ रघुनाथ संभाजी धोत्रे, आदेश विठ्ठल धोत्रे (सर्व राहणार तळेगाव दाभाडे) व संदीप ऊर्फ नन्या विठ्ठल मोरे (रा.आकुर्डी, पुणे) यांनी गावठी पिस्तुलाने गोळीबार करुन कोयत्यांनी वार करत किशोर आवारे यांचा खुन केला होता.
या गुन्ह्याच्या तपासामध्ये खूनाचा कट रचला म्हणुन गौरव चंद्रभान खळदे (रा. तळेगाव दाभाडे, पुणे) याला अटक करण्यात आली होती. दरम्यान या गुन्ह्याचा मास्टरमाईंड आरोपी चंद्रभान विश्वनाथ खळदे (वय ६३ वर्षे, रा. कडोळकर कॉलनी, ऋतुचंद्र, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) याचे नाव निष्पन्न झाले होते. तेव्हापासून भानू खळदे त्याचा मोबाईल बंद करुन गायब झाला होता. तब्बल २ महीने झाले तरीही भानू खळदे हा यापुर्वी १५ वर्षे नगरसेवक असल्याने त्याच्या बाबत कोणीही माहीती देत नसल्याने थांगपत्ता लागत नव्हता.
दरम्यान गुंडा विरोधी पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरिक्षक हरिष माने व अंमलदार प्रविण तापकीर, सोपान ठोकळ व शुभम कदम हे फरार आरोपी चंद्रभान विश्वनाथ खळदे याचे नातेवाईक, मित्र व ओळखीच्या व्यक्तींकडे तपास करीत होते. त्यानंतर नातेवाईकांच्या मोबाईल नंबरचे पोलीस अंमलदार गणेश मेदगे यांनी केलेल्या तांत्रीक विश्लेषणावरुन फरार असलेल्या आरोपीचा सुगावा लागला. चंद्रभान खळदे हा प्रथम खंडाळा, नंतर यवत ता. दौड, नंतर हैदराबाद व अखेरीस नाशिक येथील सिंधी कॉलनीत वास्तव्यास असल्याची माहीती पोलीसांच्या पथकाला मिळली.
त्यानंतर गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष माने व स्टाफ नाशिक येथे रवाना झाले. पथकाने नाशिक शहर व परीसरात आरोपीचा शोध घेवून त्याला शिताफिने पकडून पिंपरी चिंचवड येथे आणून तळेगाव दाभाडे पोलीसांच्या ताब्यात दिले. आरोपी चंद्रभान विश्वनाथ खळदे याच्यावर यापुर्वीही तळेगाव दाभाडे पोलीसांत इतर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) सतिश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरिष माने, पोलीस अंमलदार हजरत पठाण, प्रविण तापकिर, सोपान ठोकळ, गंगाराम चव्हाण, विक्रम जगदाळे, गणेश मेदगे, विजय गंभिरे, सुनिल चौधरी, नितीन गेंगजे, शाम बाबा, विजय तेलेवार, मयुर दळवी, रामदास मोहीते, ज्ञानेश्वर गिरी, कदम, तौसीफ शेख तसेच तांत्रीक विश्लेषण विभागाचे नागेश माळी व पोपट हुलगे यांनी केली आहे.