बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र, राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
![The low pressure area in the Bay of Bengal is more intense, with the possibility of torrential rains in the state](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/Pcmc-Rain.jpg)
पिंपरी चिंचवड | बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाले आहे. तसेच, गुजरातवर देखील कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या सर्वांचा संयुक्त प्रभाव म्हणून, कोकणात, मध्य महाराष्ट्रात, विदर्भात याचा प्रभाव जाणवणार आहे. त्यामुळे राज्यात आज (सोमवारी, दि.13) काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याठिकाणी अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे. मंगळवारपासून (दि.14) याची तीव्रता कमी होईल तसेच, घाट विभागात पडणारा पाऊस देखील कमी होईल असे मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने म्हटले आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मागील चार दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद मागील काही दिवसांत झाली आहे. दरम्यान, सोमवारी (दि.13) आणि मंगळवारी (दि.14) पुण्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, घाट विभागात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
मागील 24 तासांत कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर, तुरळक ठिकाणी जोरदार तसेच, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे.