पुन्हा जोर वाढला! पुढील काही दिवस अत्यंत महत्वाचे; महाराष्ट्रातील तब्बल २६ जिल्ह्यांना अलर्ट जारी

Rain Update : राज्यात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होताना दिसत आहे. पुढील काही दिवस पावसासाठी पोषण वातावरण असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस अत्यंत महत्वाचे असून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
आज हवामान विभागाने महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर , ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला अमरावती, यवतमाळ, वाशीम, नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा – ‘संरक्षण व एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची आता नवी ओळख’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
दरम्यान, अॅाक्टोबर हिटमुळे उन्हाचा पार चढलेला दिसला. परिणामी नागरिकांना घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे. काल पुन्हा एकदा पाऊसाने कोकणासह, मुंबईत, मध्य महाराष्ट्र आणि इतरत्र जोरदार हजेरी लावली. यंदाच्या ऐन दिवाळीत पाऊस पडल्याने नागरिकांच्या आनंदाचा हिरमोड झाला आहे. आता पुन्हा एकदा पाऊसाचा जोर का वाढत आहे. याचे नेमके कारण काय आहे? याबद्दल जाणून घेऊयात….
महाराष्ट्रासह दक्षिणेतील राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे पुढील दोन दिवस महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या हवामान बदलाचा थेट परिणाम महाराष्ट्रातील दक्षिण कोकण आणि गोवा तसेच मध्य महाराष्ट्राच्या काही भागांवर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.




