“संपूर्ण देशाची मान खाली घालावी लागली” : कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरील विधान प्रकरणी SC कडून MP मंत्री विजय शाह यांच्यावर SIT चौकशीचे आदेश
"लष्कर देशाची शान आहे, आणि तुम्ही अपमानजनक वक्तव्य केले – लाज वाटली पाहिजे"

नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, या प्रकरणात दाखल एफआयआरची विशेष तपास पथक (SIT) मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंग यांच्या खंडपीठाने मंत्री शाह यांना फटकारताना सांगितले की, कोर्टाने त्यांच्या वक्तव्याचे व्हिडीओ आणि त्यानंतर त्यांनी दिलेले ‘माफीनामे’ पाहिले असून, “हे खरे पश्चात्ताप होते की कायदेशीर कारवाईपासून सुटका मिळवण्याचा प्रयत्न?” असा प्रश्न उपस्थित केला.
हेही वाचा – मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना ‘संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान’ पुरस्कार जाहीर
“तुमच्या विधानामुळे संपूर्ण देश शरमेने खाली गेला” – न्यायमूर्ती सूर्यकांत
“तुमच्या विधानामुळे संपूर्ण देशाची मान खाली गेली. आम्ही व्हिडीओ पाहिले. तुम्ही अत्यंत अश्लील भाषा वापरण्याच्या मार्गावर होतात, पण नशिबाने किंवा योग्य शब्द न सापडल्यामुळे थांबले. लष्कर ही देशाची शान आहे आणि तुम्ही त्याबाबत असभ्य वक्तव्य केले. तुम्हाला लाज वाटली पाहिजे,” असे कडक शब्दांत न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी मंत्री शाह यांना सुनावले.
काय आहे प्रकरण?
कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय लष्करातील एक प्रतिष्ठित अधिकारी असून, विजय शाह यांनी नुकतेच सार्वजनिक व्यासपीठावर त्यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह आणि अपमानास्पद विधान केल्याचा आरोप आहे. या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर जनक्षोभ निर्माण झाला. त्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून, याच संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली.