अवकाळी पावसाचे संकट टळले, पण आता उकाडा वाढणार

Maharashtra Weather | राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा जोर आता पूर्णपणे ओसरला आहे. या अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार आता अवकाळीचे संकट टळले असून राज्यात पुढील 24 तासांत उन्हाचा चटका आणि उकाडा वाढण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील हवामानात असा बदल होत असतानाच, मुंबईकरांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून चिंतेचा विषय असलेल्या मुंबईच्या वायू प्रदूषणात आता मोठी घट झाली आहे. दोन दिवसांपूर्वी 172 वर असलेला मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक आता थेट 100 च्या आसपास तर उपनगरांमध्ये 50 ते 100 च्या दरम्यान मध्यम श्रेणीत आला आहे.
हेही वाचा : पिंपळे सौदागरमध्ये शिव छत्रपती लिनिअर गार्डन परिसर ‘‘चकाचक’’
सध्या मुंबईत गावदेवी परिसरात सर्वात स्वच्छ हवेची नोंद झाली असून वांद्रे पश्चिम, ब्रीच कँडी आणि कुलाबामध्येही स्थिती समाधानकारक आहे. परळ, चेंबूर, भांडूप आणि बोरीवलीत AQI 81 ते 86 च्या दरम्यान आहे. पालिकेने बांधकाम प्रकल्पांवर केलेल्या कठोर कारवाईमुळे हे प्रदूषण कमी झाले असून, दादर चौपाटीवर आकाश निरभ्र दिसत असल्याने कालपर्यंत मास्क लावणारे नागरिक आज मोकळ्या हवेचा आनंद घेत आहेत.
हवेची ही उत्तम गुणवत्ता अशीच कायम राहावी, अशी सर्वसामान्यांची आता मुख्य मागणी आहे. दरम्यान हवामानातील या सततच्या बदलांमध्ये देशभरातील तापमानाचीही नोंद घेण्यात आली आहे. संपूर्ण देशातील सर्वात नीचांकी तापमान अलवार येथे 10 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. तर महाराष्ट्रातील सर्वात नीचांकी तापमान नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे 11.3 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे.




