वर्गात उत्तरपत्रिका घेऊन सुरू होती कॉपी, राज्यमंत्र्यांच्याच कॉलेजमधला प्रकार
![The copy started with the answer sheet in the class, the type in the college of the Minister of State](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/The-copy-started-with-the-answer-sheet-in-the-class-the-type-in-the-college-of-the-Minister-of-State.jpg)
औरंगाबाद | औरंगाबाद जिल्ह्यातील फरदापूर येथील राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नॅशनल कॉलेजमध्ये बारावीच्या परीक्षेदरम्यान धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी हिंदीचा पेपर सुरू असताना विद्यार्थ्यांकडून चक्क मास कॉपी होत असतानाचा पाहायला मिळाला. येथील विद्यार्थ्यांकडून सर्रास कॉपी करताना दिसून आले. या महाविद्यालयात परीक्षार्थी थेट बाकावर पुस्तकाची पाने ठेवूनच उत्तरे लिहीत असताना कॅमेऱ्यात चित्रित झाले आहे.
गेल्या महिन्यात दहावीच्या परीक्षेत औरंगाबादेत खुलेआम कॉपी सुरू असल्याचे ‘महाराष्ट्र टाइम्स’ने समोर आणलं होतं. त्यानंतर विधानसभेत बोलताना शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी संबधीत शाळेची मान्यता रद्द करण्याची घोषणा करत, यापुढे सुद्धा परीक्षेदरम्यान कॉपी करताना जर कोणी आढळले, तर त्या शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल अशी तंबी दिली होती. तरीदेखील अब्दुल सत्तार यांच्या नॅशनल कॉलेजमध्ये बारावीच्या परिक्षेदरम्यान मास कॉपीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आता शिक्षणमंत्री आता सत्तार यांच्या शाळेवर कारवाई करतील का? हे पाहणं महत्वाचे ठरेल.
अशी सुरू होती मास कॉपी…
अब्दुल सत्तार यांच्या नॅशनल कॉलेजमध्ये मंगळवारी बारावीचा हिंदी विषयाचा पेपर झाला. यादरम्यान विद्यार्थी अक्षरशः टेबलवर पुस्तकांचे पान ठेवून उत्तर लिहिताना पाहायला मिळाली. तर काही विद्यार्थी या टेबलावरून त्या टेबलावर उत्तर पाहण्यासाठी फिरतांना पाहायला मिळाली. तसेच वर्गात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवण्यासाठी बाहेरून सुद्धा काही तरुण प्रयत्न करताना पाहायला मिळाले. तसेच कॉलेजच्या खिडकीच्या बाहेर असंख्य कॉप्यांचा खच पडलेला देखील पाहायला मिळाला.