Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“माय मराठीसाठीची लढाई आता प्रत्येकाच्या उंबरठ्यावर…” साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांचे मत

सातारा : ‘या देशाच्या भूत-भविष्याच्या विचाराला आरंभ होण्याआधी मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या गाभ्याला साहित्य संमेलनाने हात घातला आहे. मायमराठीच्या अस्तित्वाची लढाई आता आपल्या प्रत्येकाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. उद्या तुमच्या देव्हाऱ्यावर विठोबा समवेत ज्ञानेश्वर आणि तुकारामाच्या प्रतिमा टिकाव्यात असे वाटत असेल, तर वेळीच झोपेतून जागे व्हा. तुमच्या खांद्यावर झेंडा कोणत्याही जातीचा, पक्षाचा वा धर्माचा असुदे. त्याचा दांडा हा मराठीच असायला हवा. तुमच्या खांद्यावर पालखी कोणाचीही असुदे तिचा गोंडा मराठीच असायला हवा’, अशी आग्रही भूमिका ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी शुक्रवारी अध्यक्षीय भाषणात मांडली.

‘धान्य पिकवणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पत्नीचा व मातेचा गौरव व्हायला पाहिजे. त्यासाठी ‘लढाऊ धरतीमाता’ नावाची नवी योजना हाती घ्यावी, माफक दरात पुस्तक विक्रीच्या दुकानांना परवानगी द्यावी, ग्रंथालये, मराठी शाळा टिकविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, महाराष्ट्रातच माय मराठीचे अध:पत होऊ नये या करीता सर्व स्तरांवर प्रयत्न व्हावेत, अशा सूचनाही पाटील यांनी केल्या.

पाटील म्हणाले, ‘लेखक किंवा कवीला कोणतीही जात नसते. मात्र, त्याला धर्म असतो. जो धर्म असतो तो फक्त मानवता धर्म! जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते. तेव्हा-तेव्हा गेल्या दोनशे वर्षात सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुद्धा साहित्यिकांनी उचललेली आहे. कवीच्या हृदयातून आलेले सच्चे शब्द प्रसंगी सत्तेच्या सिहांसनासमोर झुकत नाहीत, हे या भूमितील साहित्यिकांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे.’

‘नोकरी नाही, म्हणून प्रत्येक खेड्यात शेकडो मुले बिनालग्नाची आहेत. बेकारीत पोळणाऱ्या मुलाशी लग्न करण्या ऐवजी डोक्यावर अक्षताच न पडलेल्या बऱ्या अशा विचाराने शेकडो मुलींचे विवाह लांबणीवर पडले आहेत. शेतीमालाला भाव नाही. ही भयानक शांतता आणि अस्वस्थता उद्याच्या भीषण भविष्याला आमंत्रण देणारी आहे हे बिलकुल विसरू नका. एका गोष्टीचे मला खूप दुःख वाटते, ते असे की, आमच्या पिढीतल्या साहित्यिकांनी जाणीवपूर्वक शेतकरी आत्महत्यांच्या दुष्ट पर्वामागच्या दु:खाची कारणमीमांसा आपल्या साहित्यातून सखोलपणे व्यक्त करायला हवी होती. बळीराजांच्या आत्महत्यांचे विषारी पर्व म्हणजे या भूमीतील सर्व राजकीय पक्षांचे, समाजाचे नव्हे तर आम्हा लेखक कलावंताचेसुद्धा अपयश आहे. गेल्या ४४ वर्षात शेतकऱ्यांच्या आत्महत्येमागचे कारण शोधणे आणि त्याचे निवारण करणे हे कोणालाही जमलेले नाही. अन खरे कारण म्हणजे काय, तर शेतकऱ्याला शेतीचा धंदा करणेच परवडत नाही. म्हणून तो म्हणे मरणाला मिठी मारतो.’

हेही वाचा –  “भारताचा विकास झाला तर शेजारी…” ; बांगलादेशच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी दिले ‘हे’ उत्तर?

पाटील म्हणाले, ‘लाडक्या बहिणी प्रमाणेच मातीशी झट्या घेऊन धान्य पिकवणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पत्नीचा व मातेचा गौरव व्हायला पाहिजे. त्यासाठी ‘लढाऊ धरतीमाता’ नावाची नवी योजना हाती घ्यावी. एकीकडे त्या मतदान करण्यासाठी उपयोगी पडतीलच, पण त्याच वेळी जात शेतकऱ्याची असल्यामुळे त्या अन्नधान्य पिकवण्याचा आपला मूळ धर्मसुद्धा अजिबात विसरू शकणार नाहीत, याची मला खात्री आहे. कोणी म्हणेल कर्ज वाढते आहे. मराठीमध्ये एक म्हण आहे, ‘भरलेल्या बैलगाडीला चिपाडाने किंवा पाचटाने काय ओझे?’ त्यामुळे या योजनेच्या खर्चाने फारसा फरक पडणार नाही.’

‘प्राथमिक स्तरावरील मुलांवर इतर भाषांचे ओझे, दडपण देऊ नये. मराठी व्यतिरिक्त इतर भाषांची सक्ती करणे अयोग्य आहे, असे मी मराठी भाषेची शिक्षिका असल्यामुळे अनुभवातून ठामपणे सांगत आहे, असा सल्ला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी दिला. ग्रामीण, अर्ध ग्रामीण गावात नवीन मुले-मुली लिहिती झाली आहेत, तसेच नवीन प्रकाशक निर्माण होत आहेत, ही बाबही आश्वासक आहे. जेव्हा निरनिराळ्या जाती जमातीतील लोकं लिहायला लागतील तेव्हा त्यातील शब्द मराठी साहित्यात रुजतील आणि त्यातूनच मराठी भाषा समृद्ध होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘मराठी भाषा देश, धर्म, जात याच्या पलीकडेच नव्हे तर ती महाराष्ट्राच्या बाहेरही पोहोचली आहे. मराठी माणूस जिथे जिथे गेला तिथे त्याने मराठीची रुजवण केली, याची दखल आपण घेणार आहोत की नाही? मराठी भाषेविषयी त्या म्हणाल्या, मी प्रमाणभाषा, शुद्ध, अशुद्ध, मंगल, अमंगल भाषा असे भेद मानत नाही. जुने असते ते सगळेच सोने असते किंवा नवे सगळेच टाकाऊ असते असे माझे मत नाही. सत्व ओळखणाऱ्या जाणकारांना या गोष्टी पटू शकतात’, असे त्यांनी सांगितले.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला याचा आनंद झाला. पण आता प्रश्न आहे की, आपण मराठी भाषा साहित्य निर्मितीसाठी पायाभूत असे काही करणार आहोत की नाही? संस्कृती ही नेहमी समूहाची असते. समूहातील प्रत्येक व्यक्ती व्यक्त होऊ शकत नाही. त्यामुळे माझ्या भाषणातील विचार त्यांना आवडले कारण ते विचार त्यांचेही होते. मी फक्त त्यांच्या भावना अभिव्यक्त केल्या. त्यामुळे मी समूह मनाचा आवाज झाले’, असे त्यांनी सांगितले.

नाशिक येथे होत असलेल्या कुंभमेळ्यानिमित्त होणाऱ्या वृक्षतोडीवर भाष्य करताना भवाळकर म्हणाल्या, ‘गोदावरी काठी असलेल्या तपोवनावर कुऱ्हाडी चालणार नाहीत याची खबरदारी घेतली पाहिजे, कारण प्रकृती टिकली तरच आपण टिकणार आहोत. आपण प्रकृतीचाच एक भाग आहोत. आपल्याला जगायचे असेल तर झाडे, वने टिकायला हवीत. झाडे टिकली तरच आपली पुढची पिढी जगेल हे समजायला हवे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button