तौते चक्रीवादळ नुकसान पाहणी दौरा : मुख्यमंत्र्यांच्या टिकेला फडणवीसांचं चोख प्रत्युत्तर !
मुंबई – तौते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणच्या दौऱ्यावर आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग येथे उद्धव ठाकरे यांनी पाहणी दौरा केला. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. मी वैफल्यग्रस्त नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील कोकण दौऱ्यावर असून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला चोख उत्तर दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच गुजरातचा पाहणी दौरा केला. त्यांनी गुजरातला जाहीर केलेल्या आर्थिक मदतीवर विचारण्यात आलं असता आपल्याला त्यात राजकारण आणायचं नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान संवेदनशील आहेत. गुजरातप्रमाणे महाराष्ट्राच्या मागेही ते उभे राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मी विरोधी पक्षनेता नाही, त्यामुळे वैफल्यग्रस्त नाही असा टोला देखील त्यांनी फडणवीसांना लगावला.
कोकणाने शिवसेनेला भरभरुन दिलं आहे, आता शिवसेना कोकणाली किती देते या फडणवीसांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना देताना ते म्हणाले की, “त्याची काळजी तुम्ही करु नका. कोकण आणि शिवसेनेचं नात घट्ट आहे. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यात कमी जास्त काही होणार नाही”, असे मुख्यमंत्री म्हणाले होते.
त्याला प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, “या दौ-यावर मला काही ही राजकीय बोलायचं नाही, अन्यथा मीदेखील बोलू शकतो. पण मुख्यमंत्री आले त्याचं समाधान आहे. आम्ही त्याचं राजकारण करत नाही. पण मग जे लोक प्रश्न विचारतात की पंतप्रधान गुजरातला का गेले आणि महाराष्ट्रात का आले नाहीत ? मग येथे मुख्यमंत्रीदेखील दोनच जिल्ह्यात का आले? रायगड, कोल्हापूर, साताऱ्याला का गेले नाहीत?,” अशी विचारणा देवेंद्र फडणवीसांनी केली. पुढे ते म्हणाले की, “तुम्ही येता आणि जाता…. मागच्या वेळीदेखील येऊन गेलात. नुसत्या बाता मारत असून कोकणाला काही दिलं नाही. गेल्यावेळचे निसर्ग वादळाचे पैसेही यांनी दिलेले नाहीत आणि येथे येऊन राजकीय वक्तव्य करतात याचं आश्चर्य वाटतं”.