Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

घरफोडीचा ‘नेपाळी पॅटर्न’

गुंगीचे औषध देऊन घरफोडी : पोलिसांकडून तिघांना अटक

पिंपरी चिंचवड :  घरकामाच्या बहाण्याने घरात प्रवेश करून गुंगीचे औषध देऊन घरफोडी करणाऱ्या नेपाळी टोळीच्या तिघांना निगडी पोलिसांनी अटक केली. या टोळीने प्राधिकरण परिसरातील एका घरातून १६.२० लाख रुपयांचा ऐवज लंपास केला होता. नाने कमल बहादुर शाही, नवीन बहादुर शाही, नर बहादुर शाही (सर्व रा. नेपाळ) अशी अटक करण्‍यात आलेल्‍या आरोपींची नावे आहेत.

पोलीस उपायुक्‍त स्‍वप्‍ना गोरे यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, २४ नोव्हेंबर २०२४ रोजी फिर्यादी यांच्या अनुपस्थितीत घरकाम करणाऱ्या नेपाळी महिलेने फिर्यादींच्या मुलगा व सुनेला कॉफीतून गुंगीचे औषध दिले. त्यानंतर साथीदारांना बोलावून तिजोरी फोडून रोकड व दागिने चोरी केले. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा –  ‘…तर पाकिस्तानवर तहानेने मरण्याची वेळ येईल’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या आदेशानुसार तपास सुरू करण्यात आला. तपास पथकाने सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल विश्लेषण आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपींचा मागोवा घेतला. पाच दिवसांत नाने कमल बहादुर शाही याला हिंजवडी येथून अटक करण्यात आली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार उर्वरित आरोपींची नावे निश्‍चित करून त्‍यांचा शोध घेण्यात आला. सततच्या तांत्रिक तपासानंतर नवीन बहादुर शाही व नर बहादुर शाही यांना बंगलोर विमानतळावर पकडण्यात आले. आरोपींकडून ४.०५ लाखांचे दागिने जप्त करण्यात आले असून उर्वरित मुद्देमाल नेपाळमध्ये विकल्याचे निष्पन्न झाले आहे.

चोरीचा नेपाळी पॅटर्न

आरोपी भारतातील मोठ्या शहरांमध्ये घरकाम मिळवून घरमालकांचा विश्वास संपादन करीत असे. त्‍यानंतर संधी मिळताच गुंगीचे औषध देऊन चोरी करीत असे. गुन्ह्यानंतर लगेच नेपाळमध्ये पळून जात असे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

घर कामाला नोकर ठेवताना मालकांनी शहानिशा करणे गरजेचे आहे. वेळोवेळी पोलीस ठाण्यांना त्याबाबतची माहिती देणे महत्वाचे आहे. आपल्याकडे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी पाहणे मालकांनी टाळल्यास अनुचित घटना घडतात. वेळप्रसंगी जीवित हानी देखील होऊ शकते त्यामुळे सतर्कता महत्त्वाची आहे.

स्वप्ना गोरे,पोलीस उपायुक्‍त

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button