सुषमा अंधारेंची राणेंवर टीका, मुलांना संस्कार देण्यात माझा भाऊ कमी पडलाय…
![Sushma Andharen criticizes Rane, my brother has fallen short in imparting sanskar to children...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/Sushma-Andhare-1.png)
कणकवली । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कोकण दौरा केला. या दौऱ्यात अंधारे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पुत्रांवर निशाणा साधला. आपला नीतू आणि नीलू हे माझे दोन भाचे प्रचंड आगाऊ लेकरं आहेत. तसेच त्यांचा अभ्यासही कमी आहे. परंतु आमच्या भावाचं म्हणजेच नारायणरावांचं त्यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळे त्यांना संस्कार देण्यात माझा भाऊ कमी पडलाय, अशी टीका सुषमा अंधारे यांनी नारायण राणे यांच्यावर केली.
कणकवलीत जाऊन घेतलेला होमवर्क राणे कुटुंबाच्या जिव्हारी लागला असल्यामुळे ते आपल्यावर टीका करत असल्याचा पलटवार अंधारे यांनी केला. हिंदुहृदयस्रमाट बाळासाहेब ठाकरेंची थिल्लरपणे टवाळी करणाऱ्यांच्याच हातात शिवबंधन कसं?, असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी अंधारे यांना ट्विटच्या माध्यमातून विचारला होता. परंतु आज नाशिकच्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी पलटवार केला.
आपला नीतू आणि नीलू हे माझे दोन भाचे प्रचंड आगाऊ लेकरं आहेत. त्यात त्यांचा अभ्यास कमी आहे. वर आमच्या भावाचं म्हणजे नारायणरावांचं त्यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे. त्यांना संस्कार देण्यात आणि वळण लावण्यात माझा भाऊ कमी पडलाय. पण हरकत नाही आपलेच भाचे आहेत, असं अंधारे म्हणाल्या.
उद्धव ठाकरे मंत्रालयात जात नव्हते, अशी त्या लोकांची तक्रार होती. आताचे मुख्यमंत्री तरी कुठे मंत्रालयात जातात? ते गणपती, नवरात्र, आणि पितृ पक्ष जेवायला जातात. त्यातून वेळ मिळाला ती ज्योतिषाला हात दाखवायला जातात, असं म्हणता अंधारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.