सुप्रिया सुळेंनीही केली अजितदादांची पाठराखण…
![Supriya Sule also supported Ajitdad...](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/Supriya-Sule-780x470.jpg)
कर्जत : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणण्यापेक्षा स्वराज्यरक्षक म्हणावे, असं विधान केलं होतं. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्यरक्षक होते, यावरून वाद पेटला आहे. दरम्यान यावर काल राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी वक्तव्य करत पाठराखण केल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही अजित पवार यांची पाठराखण केली आहे. त्या अहमदनगरमधील कर्जत येथे बोलते होत्या.
सुळे म्हणाल्या की, मला वाटतं महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अस झालं असेल की सत्ताधारी लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत, मात्र एखादं वक्तव्य जर झालं असेल तर त्याबाबत तज्ञांचा सल्ला घेऊन त्यावर चर्चा होऊ शकते. आज देशापुढे बेरोजगारी आणि महागाई हे मोठं आव्हान आहे. आंदोलने करण्याचा भाजपला अधिकार आहे मात्र जेव्हा विरोधी पक्षनेते अजित पवार हे बेरोजगारीवर बोलतात, महागाईवर बोलतात तेव्हाही भाजपने रस्त्यावर आमच्याबरोबर आंदोलनात उतरावं असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांची पाठराखण केली.
अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत सुप्रिया सुळे यांना विचारले असता यावर त्या बोलत होत्या. कर्जत येथे दादा पाटील महाविद्यालयात कार्यक्रमासाठी आल्या असता बोलत होत्या. भाजपच्या लोकांकडून महापुरुषांबाबत काही वक्तव्य झालं तर त्यावेळी ते दुटप्पी भूमिका घेतात अशी टीका सुळे यांनी केली. जेव्हा राज्यपालांनी आणि त्यांच्या काही मंत्र्यांनी महापुरुषांचा अपमान केला तर त्यांची भूमिका वेगळी असते.