‘शिवजयंती उत्साहाने साजरी करतानाच शिवभक्तांना सर्व सुविधा पुरविण्याची चोख व्यवस्था करा’; जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
![Suhas Diwase said that make proper arrangements to provide all the facilities to Shiva devotees](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/Suhas-Diwase-780x470.jpg)
पुणे | किल्ले शिवनेरी येथे आगामी शिवजयंती महोत्सव उत्साहाने साजरा करण्याच्यादृष्टीने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. शिवजयंती उत्साहात साजरी करत असतानाच येणाऱ्या शिवभक्तांना कोणत्याही असुविधांना सामोरे जावे लागू नये यासाठी आवश्यक सेवा सुविधा पुरविण्याची व्यवस्था करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले. जुन्नर पंचायत समिती येथे शिवजयंती आढावा बैठकीत ते बोलत होते.
शिवजयंती हा आनंद उत्सव असून त्यातून सर्वांनाच प्रेरणा मिळते असे सांगून डॉ. दिवसे म्हणाले, महसूल, पोलीस विभाग, वन विभाग तसेच अन्य विभागांची यात मोठी भूमिका आहे. यासह अन्य सर्वच यंत्रणांनी या उत्सवाचे व्यवस्थापन चांगल्याप्रकारे व्हावे यासाठी समन्वयाने काम करावे. सर्व व्यवस्था सज्ज ठेवण्यात यावी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणा, मेगाफोन देण्यात येतील. हा उत्सव हरित असावा म्हणून प्लास्टिक नियंत्रण करावे तसेच कचरा जमा करण्याची व विल्हेवाट लावण्याची व्यवस्था करा, असेही ते म्हणाले.
गर्दी नियंत्रणासाठी मुख्य सभेचे ठिकाण बदलण्याविषयक भारतीय पुरातत्व विभागासोबत (एएसआय) चर्चा सुरू आहे, असे सांगून ते म्हणाले, शिवजन्म स्थळ तसेच शिवकुंजची सजावट, रोषणाई, पायथा ते दत्त मंदिर पर्यंत पथदिव्यांसाठी वीज व्यवस्था चांगल्याप्रकारे करावी. गडावर तसेच तसेच दत्त मंदिर आणि पायथ्यासह शहरातही स्वच्छ्ता गृहे आणि इतर स्वच्छता विषयक चांगले व्यवस्थापन करावे. पर्यटन विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या दुर्गोत्सवातील बचत गट आणि अन्य स्टॉल, टेन्ट सिटी, जाणता राजा महानाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम आदींबाबत माहिती, प्रसिद्धी करावी असेही त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनी पाणीपुरवठा, स्वच्छ्ता, आरोग्य व्यवस्था आदींचा आढावा घेतला. पुरेशा प्रमाणात राखीव बेड, अतिदक्षता खाटा, आरोग्य पथकांची नेमणूक, रुग्णवाहिका ठेवण्यात येणार आहेत. तसेच पाण्याची तपासणी व ते शुद्धीकरण करण्यात येणार आहे. पंचायत समिती तसेच जुन्नर नगर परिषदेच्या माध्यमातून फिरते व स्थिर तात्पुरती स्वच्छ्ता गृहे उभारण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
हेही वाचा – भाजपाकडून अशोक चव्हाण, अजित गोपछडे, मेधा कुलकर्णींना राज्यसभेचं तिकीट
डॉ. पंकज देशमुख म्हणाले, शिवभक्तांना कार्यक्रम सुरू असताना दर्शनासाठी अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागू नये प्रयत्न सुरू आहेत. फक्त मुख्य कार्यक्रमाच्या वेळी थोड्याच कालावधीसाठी गर्दीला थांबविण्यात येणार असून नागरिकांना हत्ती दरवाजा, मीना दरवाजा, कुलूप दरवाजा या ठिकाणी तसेच अन्य ठिकाणीही कार्यक्रम पाहण्यासाठी एलईडी स्क्रीन बसविण्यात येतील. दत्त मंदिर येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असून आवश्यक तेथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त पुरविण्यात येईल. शिवजन्म उत्सव साजरा करत असताना त्याप्रसंगी गर्दी नियंत्रणाच्यादृष्टीने अत्यंत मर्यादित स्वरूपात प्रवेश पासेस देण्यात येणार आहेत, असेही ते म्हणाले.
शिवनेरी किल्ल्यावर कायमस्वरुपी वीज उपलब्ध होण्याच्यादृष्टीने सौर पॅनेल बसविता येतील का हे महाऊर्जाकडून तांत्रिक व व्यवहार्यता तपासणी करुन घ्यावी. परिवहन मंडळाने अधिकच्या बसेसची व्यवस्था करावी. पर्यटन विभागाने गडावरील कार्यक्रमात सहभाग घेण्याच्या दृष्टीने पुढील काळात पुढाकार घ्यावा, ड्रोनद्वारे गर्दीची पाहणी व नियंत्रण, आपत्ती व्यवस्थापनसाठी पथकांची नेमणूक आदी विषयांच्या अनुषंगाने यावेळी चर्चा झाली.
गडावरील सुविधांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
तत्पूर्वी पहाटे जिल्हाधिकारी डॉ. दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण आणि पोलीस अधीक्षक श्री. देशमुख, उप वन संरक्षक अमोल सातपुते यांनी शिवनेरी गडावर भेट देऊन तेथील सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
या प्रसंगी उप विभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्यासह वनविभाग, पोलीस, महावितरण, पंचायत समिती, एएसआय आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.