राज्य परिवहन कर्मचारी संघटनेची बेमुदत संपाची हाक
राज्यभरातील प्रवाशांची गैरसोय,ऐन गणेशोत्सवात चाकरमान्यांचेही हाल
महाराष्ट्र : राज्य परिवहन (एसटी) कर्मचारी संघटनेने बेमुदत संपाची हाक दिली आहे. यामुळे एसटी कर्मचारी संघटना आजपासून बेमुदत आंदोलन करत आहेत. त्यामुळे राज्यातील एसटींची वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे. एसटीच्या संपामुळे राज्यभरातील प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे. ऐन गणेशोत्सवात एसटी कर्मचाऱ्यांकडून संपाची हाक देण्यात आल्याने चाकरमान्यांचेही हाल होत आहेत. आता यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाष्य केले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबद्दल आम्ही उद्या बैठक बोलवलेली आहे. यापूर्वीही एक बैठक पार पडली आहे. एसटी ही गावोगावी जाणारी आहे. त्यासाठी उद्या बैठक बोलवण्यात आलेली असून त्यात सकारात्मक चर्चा होईल. गणेशोत्सव जवळ आला आहे. अनेक नागरिक खरेदी विक्री करण्यासाठी बाजारपेठामध्ये जाण्यासाठी एसटीचा वापर करतात. त्यामुळे माझे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन आहे की तुम्ही संप करु नका. आपण याबद्दल सकारात्मक चर्चा करु आणि चर्चेतून तुमचाही प्रश्न सुटेल,असे एकनाथ शिंदे म्हणाले.





