शिव रेल्वे स्थानकातील 112 वर्षे जूना ब्रिटिशकालीन पूल 1 ऑगस्टपासून बंद!
सायन पूल बंदचा फटका, मुंबईकरांना वाहतूक कोडींचा ताप, वाहनांच्या लांब, लांब रांगा
मुंबई : सायन स्थानकातील 112 वर्षे जूना ब्रिटिशकालीन पूल 1 ऑगस्टपासून बंद करण्यात आला. हा पूल सर्व वाहनांसाठी पुढील दोन वर्ष आता बंद करण्यात आलेला आहे. त्याचे पडसाद उमटत लागले आहेत. यामुळे मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे घाटकोपरपासून सायन चुनाभट्टीपर्यंत नियमित वाहतूक ठप्प होत आहे. सायन पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी 50 कोटी खर्च येणार आहे.
वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला एलबीएस मार्ग, धारावी आणि शीव यांना जोडणारा हा उड्डाण पूल आहे. चार भागांच्या वाहतुकीवर यामुळे परिणाम झाला आहे. हा प्रकार दोन वर्ष राहणार आहे. त्यामुळे या भागांत राहणाऱ्या मुंबईकरांना चांगलाच ताप होणार आहे.
पर्यायी मार्ग ठप्प
सायन आरोब बंद झाल्याने मुंबईच्या बीकेसी कनेक्टर या पर्यायी मार्गाला निवडले जात आहे. परंतु ट्रॅफिक चेंबूरच्या सुमन नगर जंक्शनपर्यंत पोहोचण्यासाठी संथ गतीने जात आहे. कारण या ठिकाणी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. जवळपास साडेचार किलोमीटरपर्यंत वाहतूक खोळंबली आहे. 10 मिनिटांच्या प्रवासासाठी 40 ते 50 मिनिटांचा वेळ लागत आहे. वेस्टन एक्सप्रेस हायवेवर होत असलेल्या वाहतूक कोंडीप्रमाणेच आता ईस्टर्न एक्सप्रेस हायवे सुद्धा वाहतूक कोंडीचा नवीन अड्डा बनलाय का? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.