रोहित पवारांना धक्का, कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीकडून जप्त
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांना सर्वात मोठा धक्का बसणारी बातमी समोर आली आहे. रोहित पवार यांचा बारामती अॅग्रो कंपनीने खरेदी केलेला कन्नड सहकारी साखर कारखाना ईडीने जप्त केला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीआधी ईडीची ही सर्वात मोठी कारवाई आहे. ईडीने शिखर बँक घोटाळा प्रकरणी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून ईडीची कारवाई सुरु होती. ईडीने या प्रकरणी अनेक ठिकाणी छापेमारी देखील केली. त्यानंतर आता कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा – महाराष्ट्राने फक्त राम राम म्हणत घंटा वाजवायची का? उद्धव ठाकरेंचा सवाल
ईडीने शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त केला आहे. या जप्त केलेल्या कारखान्याची किंमत ही ५० कोटी २० लाख इतकी आहे. या प्रकरणी १६१ एकर जमीन ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणात सर्वात आधी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
राष्ट्रवादीचे अनेक नेते या प्रकरणात आरोपी बनवण्यात आले होते. रोहित पवार यांचीसुद्धा जवळपास ३ दिवस चौकशी झाली होती. सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात आल्यानंतर ईडीकडून कन्नड सहकारी साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे. कन्नड सहकारी साखर कारखाना खरेदी करताना शिखर बँकेने जी प्रक्रिया राबवली होती ती चुकीची होती असं ईडीने म्हटलं होतं. त्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे.