विधान परिषद मतदानासाठी शिवसेनेची पुन्हा कसोटी, दोन दिवस आधीच आमदारांना नजरकैद होणार!
![विधान परिषद मतदानात शिवसेनेची पुन्हा कसोटी, दोन दिवस आधीच आमदार नजरकैद होणार!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/विधान-परिषद-मतदानात-शिवसेनेची-पुन्हा-कसोटी-दोन-दिवस-आधीच-आमदार.jpg)
मुंबई : राज्यसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून जोरदार धक्का बसल्यानंतर शिवसेनेने आता विधान परिषद निवडणुकीसाठी अधिक काळजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने आपल्या आमदारांना निवडणुकीच्या दोन दिवस आधीच हॉटेलमध्ये हलवण्याची व्यवस्था केली आहे. तर दुसरीकडे पाचवा उमेदवार कसा निवडून आणावा याची रणनीती आखण्यासाठी भाजपनेही बैठकांचे सत्र सुरू केले आहे. विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जून रोजी निवडणूक होणार आहे. १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात असल्याने घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.
राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाल्याने त्यांनी आधीपासूनच खबरदारीचे सर्व उपाय योजण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी त्यांनी निवडणुकीच्या दोन दिवस आधीच म्हणजेच १८ जूनला पक्षाच्या सर्व आमदार आणि समर्थक अपक्ष आमदारांना पवई येथील हॉटेल रिनेसन्समध्ये मुक्कामी बोलावले आहे. याच हॉटेलमधून सर्व आमदार २० जून रोजी विधान भवनात मतदानासाठी जाणार आहेत. दुसरीकडे, भाजपनेही रणनीती आखण्यासाठी बुधवारपासून बैठकांना सुरुवात केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर विश्वासू नेत्यांची बैठक घेण्यात आली. आशीष शेलार यांच्यासह उमेदवार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांनी या बैठकीला उपस्थिती लावली.
ठाकूर यांची मनधरणी
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्र ठाकूर यांची बुधवारी भेट घेतली. राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीनेही परिषदेची निवडणूक अधिक गांभीर्याने घेतली आहे. अपक्षांमध्ये बहुजन विकास आघाडीकडे अधिक मते असल्याने हितेंद्र ठाकूर यांची मनधरणी करण्यासाठी जागताप यांनी त्यांची भेट घेतली.