शिवसेना युपीएचा भाग नाही; खासदार संजय राऊत यांचं मोठं विधान
![शिवसेना युपीएचा भाग नाही; खासदार संजय राऊत यांचं मोठं विधान](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/11/Sanjay-Raut-PTI-1.jpg)
मुंबई |
संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बिगरभाजपा पक्षांची एकत्रित रणनीती आखण्यासाठी तसेच, संसदेबाहेरही विरोधी पक्षांमध्ये अधिक समन्वय साधण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पुढाकार घेतला. त्यादृष्टीने विरोधी पक्षांच्या नेत्यांची पहिली बैठक मंगळवारी सोनिया गांधी यांच्या दहा जनपथ या निवासस्थानी झाली. आगामी काळातही राज्या-राज्यांमध्ये विरोधकांचे धोरण ठरवण्यासाठी बैठका घेतल्या जाणार असून बुधवारीही विरोधी पक्षनेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना खुलासा केला. “काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिय गांधी यांच्या निवासस्थानी बैठक झाली. प्रमुख विरोधी पक्षांचे नेते तिथे उपस्थित होते. देशातील सध्याची राजकीय स्थिती तसंच उत्तर प्रदेशसह ज्या राज्यात विधानसभा निवडणुका आहेत तेथील एकंदर स्थितीवर तसंच त्यात विरोधी पक्ष साधारण एकत्रितपणे काय भूमिका निभावू शकतो यावर प्राथमिक चर्चा झाली,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
“शरद पवार, फारुख अब्दुल्ला, सिताराम येचुरी यांच्यासह महत्वाचे नेते उपस्थित होते. शिवसेनेच्या वतीने मी उपस्थित होतो. उद्धव ठाकरेंनी मला तिथे उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. कारण सोनिया गांधींनी बैठकीसंदर्भात त्यांना फोन केला होता. चांगली बैठक झाली असून काही चर्चा सकारात्मक होत्या. पुन्हा लवकरच बैठक व्हावी अशी सूचना शऱद पवारांनी मांडली. त्यावरही फार वेळ न लावता भविष्यात अशा बैठका वेळेत व्हाव्यात जेणेकरुन सर्वांना सोयीचं होईल अशी भूमिका घेण्यात आली,” असं संजय राऊत यांनी सांगितलं. ममता बॅनर्जी यांनी युपीए कुठे आहे? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यासंबंधी बैठकीत चर्चा झाली का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “त्यावर थोडी फार चर्चा झाली. भाजपाशी ममता बॅनर्जीसुद्धा आणि आम्हीसुद्धा लढत आहोत, मग मतभेदाचं कारण काय?. जर २०२४ चं टार्गेट एक आहे तर मग वेगवेगळं लढण्यापेक्षा सर्व मतभेद विसरुन समन्वयाने एकत्र यायला हवं अशी भूमिका सर्वांनी घेतली”.
- “आम्ही युपीएचा भाग नाही”
शिवसेना अधिकृतपणे युपीएचा भाग झाली आहे का नाही? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “आम्ही युपीएचा भाग नाही. पण महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात आम्ही एकत्र काम करत आहोत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारखे तीन प्रमुख पक्ष जेव्हा एकत्र येऊन महाराष्ट्रात सत्ता स्थापन करतात, काम करतात तो मिनी युपीएचाच प्रयोग आहे. राज्य स्तरावरील हे युपीए असून उत्तम प्रकारे काम सुरु आहे”.
- पंतप्रधान मोदींवर टीका
“पंतप्रधानांच्या तीर्थयात्रा वैगेरे ठीक आहे, पण देशातील जनता महागाईच्या वाटेवर होरपळून निघाली आहे. तिला जे चटके बसत आहेत त्यावर तुमच्याकडे काय उपाय काय आहे यावर संसदेत आज वादळी चर्चा होईल. पंतप्रधान महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यावर पंतप्रधान जास्त बोलताना दिसत नाहीत,” अशी टीका यावेळी संजय राऊतांनी केली.