रस्त्यावर उतरून लढणारा शिवसैनिक; राज्यसभेसाठी शिवसेनेच्या उमेदवारीची चर्चा होत असलेले संजय पवार कोण आहेत?
![रस्त्यावर उतरून लढणारा शिवसैनिक; राज्यसभेसाठी शिवसेनेच्या उमेदवारीची चर्चा होत असलेले संजय पवार कोण आहेत?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/रस्त्यावर-उतरून-लढणारा-शिवसैनिक-राज्यसभेसाठी-शिवसेनेच्या-उमेदवारीची-चर्चा-होत-असलेले.jpg)
कोल्हापूर : शिवसेनेच्या वतीने राज्यसभेवर पाठवण्यात येणाऱ्या दुसऱ्या जागेसाठी कोल्हापूरच्या संजय पवार यांचे नाव चर्चेत आलं आणि राज्यात सर्वत्र हे संजय पवार आहेत तरी कोण, याबाबत चर्चा सुरू झाली. कारण राज्यसभेसाठी संभाजीराजे छत्रपती यांना पर्याय म्हणून अनेक मोठीनावे पुढे येत असताना अचानक कोल्हापूर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवारांचे नाव चर्चेत आले. सामान्य शिवसैनिकास संधी देत धक्कातंत्राचे राजकारण करण्याची खेळी सेना करत असल्यानेच त्यांचे नाव पुढे आल्याचं बोललं जात आहे.
शिवसेनेकडून राज्यसभेची दुसरी जागा लढवण्यात येणार आहे. या जागेसाठी संभाजीराजे इच्छुक आहेत. मात्र, शिवबंधन बांधा आणि उमेदवारी घ्या, अशी अट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातली आहे. संभाजीराजेंनी त्यास नकार देत पुरस्कृत करण्याची विनंती केली आहे. याला शिवसेना तयार नाही. यातून संभाजीराजेंना पर्याय म्हणून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, चंद्रकांत खैरे यांच्यासह आणखी एक आश्चर्यकारक नाव चर्चेत आलं आहे. संजय पवारांचे नाव चर्चेत आल्याने त्यांच्याविषयी उत्सुकता वाढली आहे. कोल्हापूर शहरातून विधानसभा लढण्यासाठी गेले २० वर्षे तयारी करणारे, प्रत्येकवेळी उमेदवारीची चर्चा होणारे, मात्र प्रत्यक्षात ती न मिळणाऱ्या पवारांचे नाव थेट राज्यसभेसाठी पुढे आल्याने कोल्हापुरातही मोठी उत्सुकता वाढली आहे.
संजय पवार यांचा राजकीय प्रवास
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असलेले पवार हे कट्टर शिवसैनिक म्हणून परिचित आहेत. ३३ वर्षापूर्वी म्हणजे १९८९ ला त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर तीन वेळा ते कोल्हापूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. एकदा विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांना संधी मिळाली. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लढणारा नगरसेवक अशी त्यांची महापालिकेत ओळख होती. यामुळे पवार हे तीन वेळा तीन वेगवेगळ्या प्रभागातून निवडून आले. शहराच्या सर्वच प्रश्नावर आंदोलन करण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार असे. त्यामुळे लढाऊ कार्यकर्ता, कट्टर शिवसैनिक अशी पवारांची कायमची ओळख. भाजप, काँग्रेसने अनेकदा त्यांना आमिष दाखवत पक्षात घेण्याचा प्रयत्न केला, पण शिवसैनिक ही ओळख कायम ठेवण्यातच पवारांनी आनंद मानला.
संजय पवारांचे नाव गेले २० वर्षे कोल्हापूर शहर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवार म्हणून घेतले जाते. पण प्रत्यक्षात त्यांना संधी मिळाली नाही. सुरेश साळोखे आणि राजेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाली आणि ते दोन दोन वेळा निवडूनही आले. यामुळे पवारांना आमदार होता आलं नाही. करवीर तालुका प्रमुख, चार वर्षे शहरप्रमुखपदी काम केलेले पवार गेली १४ वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. युतीचे सरकार असताना आण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे उपाध्यक्षपदीही त्यांना संधी मिळाली. राज्यमंत्रिपदाच्या दर्जाचे हे पद होते. पण महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यांचे हे पद गेले.
गेले ३३ वर्षे कट्टर शिवसैनिक असणाऱ्या संजय पवारांचे नाव थेट राज्यसभेचा उमेदवार म्हणून चर्चेत आले आहे. शिवसेनेने अनेकदा सामान्य कार्यकर्त्याला संधी देत धक्कातंत्राचे राजकारण केले आहे. यामध्ये आता पवारांची वेळ आली आहे. त्यांना जर संधी मिळाली तर सेनेत सामान्य शिवसैनिकही मोठा होऊ शकतो याचा नवा पुरावाच मिळेल, असं बोललं जात आहे. दरम्यान, राज्यसभेसाठी आपल्या नावाचा विचार होत असल्याचे बातमी कळाली. मनाला अतिशय आनंद झाला. सामान्य शिवसैनिकाला एवढे मोठे पद देण्याचा विचार होत असल्याने पक्षाविषयी असलेला आदर आणखी वाढला आहे, अशी प्रतिक्रिया संजय पवार यांनी दिली आहे.