रामाच्या मंदिरात सीतेची मूर्ती का नाही? शरद पवारांचं विधान
![Sharad Pawar said why there is no idol of Sita in Rama's temple](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Sharad-Pawar-1-780x470.jpg)
पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नुकतेच राम मंदिराच्या बाबत एक वक्तव्य केले आहे. राम मंदिराबाबत सर्वजण बोलतायत, पण सीतेच्या मुर्तीबाबत का बोलत नाही, अशी नाराजी महिलांनी आपल्याकडे व्यक्त केल्याचे शरद पवारांनी म्हटले. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
शरद पवार म्हणाले की, राम मंदिर होऊन गेले, आता लोक चर्चाही करत नाहीत. अजिबात चर्चा होत नाही. एका बैठकीत माझ्यासमोर हा विषय निघाला. तुम्ही रामाचं सगळं करताय, सीतेची मूर्ती का बसवली नाही अशी तक्रार महिलांनी केली. मी महाराष्ट्रात फिरतोय, मला अनुकूल चित्र दिसतंय. लोकांमध्ये सरकारविषयी नाराजी आहे. घोषणा खूप झाल्या प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही. देशाचं चित्र सध्या सांगता येणार नाही. पण लोकांशी बोलल्यावर सरकारबद्दल अजिबात आस्था नाही असं दिसतं असंही त्यांनी सांगितले.
हेही वाचा – मतदान कार्ड आधार कार्डला लिंक करा? तरच करता येणार मतदान
यंदा देशात सर्वाधिक साखर उत्पादन महाराष्ट्रात झालं, परंतु निर्यातीचा प्रश्न समोर उभा आहे. शेतीमाल बाहेर जावा, शेतकऱ्यांच्या पदरात २ पैसे अधिक यावेत याला या सरकारचा सक्त विरोध आहे. शेतकरी दुखी असल्याने त्याचा परिणाम नक्की होतो. शेतकऱ्यांना वर्षातून एकदा ६ हजार द्यायचे, त्यानंतर खतांचे भाव वाढवले, औषधे महागली, मजुरी वाढली. तयार झालेल्या मालाला गिऱ्हाईक नाही. निर्यात करायला परवानगी नाही. ६ हजार द्यायचे आणि त्याच्या दुप्पट काढून घ्यायचे हा राग शेतकऱ्यांमध्ये आहे असंही शरद पवारांनी सांगितले.