महाविकास आघाडीचे जागावाटप नवरात्रीच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/mahaenews-3-1-780x470.jpg)
मुंबई : वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभेसाठी आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीत अद्याप जागावाटपाचा फॉर्म्युल्यावरच चर्चा सुरु आहे. जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडीत बैठकांवर बैठका सुरु आहे. मात्र महाविकास आघाडीने जागावाटपाच्या चर्चेत आघाडी घेतल्याची माहिती सत्रांकडून देण्यात आली आहे.
महाविकास आघाडीची जागावाटपाबाबत चर्चा सकारात्मक सुरु आहे. विधानसभेच्या 288 पैकी केवळ 30-35 अशा जागा आहेत जिथे तिन्हा पक्षांचे एकमत होताना दिसत नाही. त्यासाठी तिन्ही पक्ष पुन्हा बैठका घेऊन तडजोड करतील अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र उर्वरित जागांवर एकमत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप नवरात्रीच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा – ‘मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे रात्रीस खेळ चाले’; अमित ठाकरेंची टीका
महाविकास आघाडीचा तिढा असलेल्या जागांवर तिन्ही पक्षांकडून एकत्रित सर्वे केला जाणार आहे. 2019 ला जिंकलेल्या जागांमध्ये बहुतांश जागा या त्या पक्षालाच ठेवण्यावर चर्चा सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. तर काही जागांमध्ये अदलाबदल केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. महाविकास आघाडी लवकरच संयुक्त मेळावे आणि नेत्यांच्या दौऱ्यांच्या कार्यक्रमाचे नियोजन करून विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या रिंगणात उतरणार आहे.
महायुती देखील जागावाटपाची चर्चा सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहे. काही जागांवर तिन्ही पक्षामध्ये मतभेद असल्याची माहिती समोर येत आहे. महायुतीतील तीनही पक्ष आग्रही असलेल्या जागांचा तिढा वरिष्ठ पातळीवर दिल्लीत अमित शाह यांच्याकडे सोडवला जाणार असल्याचेही खात्रीलायक सूत्रांकडून कळते.