‘मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे रात्रीस खेळ चाले’; अमित ठाकरेंची टीका

मुंबई | मुंबई विद्यापीठ प्रशासनाने सीनेट निवडणूक स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. एका वर्षात दुसऱ्यांदा ही निवडणूक स्थगित झाल्याने विद्यार्थी संघटनांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी विद्यापीठ प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरून जोरदार टीका केली आहे.
अमित ठाकरे म्हणाले, विद्यापीठाने पुन्हा एकदा मागील वेळेसारखं रात्रीच्या वेळेस एक परिपत्रक काढून ही निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्याचे जाहीर केले आहे. दुसऱ्यांदा अशाच प्रकारे सिनेट पदवीधर निवडणुकांसंदर्भात परिपत्रक काढण्यात आले आहे. प्रत्येक वेळी रात्रीच परिपत्रक निघते, त्यामुळे मुंबई विद्यापीठाचा कारभार रात्रीस खेळ चाले या मालिकेसारखा चालू आहे की काय, असा प्रश्न पडला आहे.
हेही वाचा – इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला महायुती सरकारचा ‘ग्रीन सिग्नल’
मुळात कोणताही निवडणूक असो, त्या पदाधिकाऱ्यांच्या मेहनतीवर आणि परीश्रमांवर लढवल्या जातात. त्यासाठी राजकीय संघटनांचे, विद्यार्थी संघटनांचे अनेक सहकारी व पदाधिकारी दिवस-रात्र परिश्रम करत असतात. परंतु, मुंबई विद्यापीठाने जर सिनेट पदवीधर निवडणुका जाहीर करून रद्द करण्याचेच धोरण अवलंबले असेल, तर याचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जाहीर निषेध करते, असं अमित ठाकरे म्हणाले.
माझे सहकारी निवडणूक लढवण्याच्या बाजूने होते. त्यांचा सन्मान राखत, त्यांना विद्यापीठाचा भविष्यातील भोंगळ कारभार समजावून सांगितला आणि त्यांनाही परिस्थितीची जाणीव झाली. त्यामुळेच माझ्या सहकारी आणि पदाधिकाऱ्यांचे परीश्रम वाया जाऊ नयेत, म्हणून आम्ही २२ सप्टेंबर २०२४ रोजी होणाऱ्या सिनेट पदवीधर निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला. आता मुंबई विद्यापीठाने परिपत्रक काढून निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलल्या आहेत, हे पाहून आम्ही घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सिद्ध झाले आहे, असं अमित ठाकरे म्हणाले.





