दोन नक्षत्रांत जेमतेम वृष्टी; आता नजरा ‘पुनर्वसू’कडे! महिनाभरात ९३ पैकी फक्त ७ मंडळांत अतिवृष्टी

नांदेड: मृग आणि आर्द्रा या दोन नक्षत्रांमध्ये जिल्ह्यात जेमतेम पाऊस पडला. आता सोमवारपासून सुरू होणार्या पुनर्वसू नक्षत्रातील पावसावर शेतकर्यांसह सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ९३ महसुली मंडळांपैकी दोन मंडळांत दोनदा आणि ७ मंडळांत एकदा अतिवृष्टीची नोंद झाली असून पडलेल्या पावसाची सरासरी जेमतेम १६ टक्के आहे.
‘एल निनो’च्या प्रभावामुळे यंदाच्या पर्जन्यमानाबद्दल आधीच चिंता व्यक्त केली जात होती. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात पडणार्या पावसाची सरासरी सर्वाधिक आहे. गतवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात दमदार पाऊस झाल्यानंतर दोन नक्षत्रे बिनापावसाची गेली. यंदाही पहिल्या दोन नक्षत्रांत जेमतेम पाऊस झाला. गतवर्षी ३ जुलैपर्यंत जिल्ह्यात १७४ मि.मी. पाऊस झाला, तर यंदा या तारखेपर्यंत १४५ मि.मी. पाऊस झाला आहे.
गतवर्षी जुलैच्या तिसर्या आठवड्यापासून पावसाने आपले अस्तित्व आणि आपला तडाखा दाखवून दिला होता. ऑगस्टमध्ये तर वरुणाने कहर केला. मुखेड-देगलूर भागात अनेक गावे पाण्याखाली गेली. त्या संपूर्ण महिन्यामध्ये गतवर्षी १५ जण मरण पावले, शेतीचे प्रचंड नुकसान झाले.
यंदा पावसाळ्याचा पहिला महिना निराशाजनक राहिला. आतापर्यंत जेमतेम १५ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. नायगाव तालुका वगळता अन्य सर्व तालुक्यांत १०० मि.मी.पेक्षा जास्त पावसाची नोंद दिसत असली, तरी पहिल्या महिन्यात कोठेही पावसाची झड अनुभवता आली नाही. जून महिन्यातही जिल्हावासीयांनी उकाड्याचा अनुभव घेतला; पण गेल्या तीन दिवसांपासून तापमानात घसरण झाल्यामुळे काहीअंशी दिलासा मिळाला.
हेही वाचा – 40 दिवसांत कच्चे तेल 28 टक्के स्वस्त; पेट्रोल-डिझेलचे दर कधी कमी होणार?
नांदेड जिल्ह्यात अजुनही काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. त्यात मुखेड तालुक्यात ९, कंधारमध्ये ३ तर भोकरमध्ये १ टँकर सुरू आहे. शहरी भागातही आटलेल्या अनेक बोअरला अद्याप पाणी आलेले नाही; परंतु विष्णुपुरीसह जिल्ह्यातील बहुतांश जलाशयांत पुरेसा साठा असल्याने पाणीटंचाईच्या झळा तीव्र नाहीत. दरम्यान, जिल्ह्यातील पावसाचा प्रवास पाहता जुलैच्या पंधरवड्यानंतर पाऊस जोर धरतो. सध्या काही भागांत पेरणीयोग्य पाऊस झाला असला, तरी शेतकर्यांच्या मनात धाकधूक कायम आहे.
गतवर्षी मेपासून ऑगस्ट अखेरपर्यंत ठराविक अंतराने विविध मंडळांत अतिवृष्टी होत गेली. २६ जून २०२५ रोजी ३९ मंडळांमध्ये तर १७ ऑगस्ट रोजी २४ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली होती. वैशिष्ट्य असे की, अपवाद वगळता प्रत्येक तालुक्यात काही ना काही मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा बसला.
गतवर्षी मेमध्ये रोहिण्या बरसल्या त्यामुळे पेरण्या तुलनेने लवकर सुरू झाल्या; परंतु यंदा जुलैचा पहिला आठवडा संपत आला, तरीही पेरण्या प्राथमिक टप्प्यात आहेत. नांदेड जिल्ह्यात खरीपामध्ये सोयाबीनचा पेरा सर्वाधिक असतो. याशिवाय ज्वारी, मूग, उडीद, तूर यासह कापुसही मोठ्या प्रमाणात पेरला जातो. मुदखेड, अर्धापूर, उमरी, नांदेड तालुक्याचा काही भाग या परिसरात केळी व उसाची लागवड होते. यंदा मात्र केळी व ऊस वगळता अन्य पेरण्या खोळंबल्या आहेत.





