अरविंद केजरीवालांची तुरूंगात हत्या करण्याचा प्रयत्न? संजय राऊतांचा गंभीर आरोप
![Sanjay Raut said that there is an attempt to kill Arvind Kejriwal in jail](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/04/Sanjay-Raut-and-Arvind-Kejriwal-780x470.jpg)
मुंबई | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या तिहार तुरूंगात न्यायालयीन कोठडी भोगत आहेत. केजरीवाल यांना मधुमेहाचा गंभीर त्रास आहे. परंतु, तुरुंगात त्यांना मधुमेहावरील औषधं मिळवण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांचं कुटुंब त्यांच्यापर्यंत औषधं पोहोचवू शकत नसल्याची तक्रार आप नेत्यांनी केली आहे. त्यामुळे केजरीवाल यांनी न्यायालयात याचिका दाखल करून तुरुंगात इन्सुलिन देण्याची मागणी केली आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, मलाही तुरुंगात असताना माझी औषधं मिळत नव्हती. असाच अनुभव केजरीवाल यांनादेखील येत आहे. केजरीवाल यांना हाय डायबिटीजचा (उच्च मधुमेह) त्रास आहे. मात्र तुरुंगात त्यांना इन्सुलिन आणि औषधं दिली जात नाहीयेत. सरकार आणि तुरुंग प्रशासनाने थोडी मानवता बाळगली पाहिजे. अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. दिल्लीच्या विधानसभेत केजरीवाल यांच्याकडे बहुमत आहे. तसेच ते एक सामाजिक कार्यकर्तेदेखील आहेत. तुम्ही (भाजपा सरकार) त्यांना त्यांची औषधं देत नाहीत. त्यांच्या कुटुंबाला त्यांच्यापर्यंत औषधं पोहोचवू देत नाही. याचा अर्थ तुम्ही तुरुंगात त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न करताय का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
तुरुंगात असताना मलाही खूप वाईट अनुभव आले आहेत. माझी औषधं माझ्यापर्यंत पोहोचवली जात नव्हती. औषधांसाठी मला झगडावं लागत होतं. आमच्या लोकांना आमची औषधं आम्हाला देण्यापासून रोखलं जात होतं. जर आम्हालाच अशी वागणूक मिळत असेल तर तुरुंगातील सामान्य कैद्यांची काय अवस्था असेल? दिल्लीचे माजी मंत्री मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन, झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही असाच त्रास सहन करावा लागत आहे. राजकीय बदला घेण्यासाठी तुम्ही या लोकांना तुरुंगात टाकलं आहे आता किमान त्यांना त्यांची औषधं तरी द्या, असं संजय राऊत म्हणाले.
आणीबाणीच्या काळात अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखे अनेक मोठे नेते तुरुंगात होते. माझ्या माहितीप्रमाणे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी या स्वतः वेगवेगळ्या तुरुंगांच्या तुरुंग अधिकाऱ्यांशी बोलायच्या. ज्या ज्या तुरुंगात या नेत्यांना ठेवलं होतं तिथे त्यांची योग्य व्यवस्था आहे का ते पाहायच्या. त्यांची औषधं, त्यांचं जेवण त्यांना मिळतंय का याची माहिती घ्यायच्या. या नेत्यांच्या सर्व गरजा तुरुंगात पूर्ण होतायत का त्यावर लक्ष ठेवायच्या. परंतु, देशातलं मोदी-शाहांचं खतरनाक आणि सैतानी सरकार असं काही करत नाही. ते मुख्यमंत्र्यांना औषधं मिळू देत नाहीयेत, असंही संजय राऊत म्हणाले.