breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘साने गुरुजींच्या स्मारकास निधी उपलब्ध करून देणार’; उपमुख्यमंत्री अजित पवार

९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अमळनेर येथे थाटात उद्घाटन

जळगाव : महाराष्ट्रात अध्यात्म, ज्ञान,  तत्वज्ञान रूजविणार अमळनेर हे महत्त्वाचे शहर आहे. राज्याचा सर्वांगिण विकासाबरोबर साहित्य, कला, संस्कृती व क्रीडा क्षेत्रातही शहरांचा विकास झाला पाहिजे. तरच ते शहर श्रीमंत शहर म्हणून ओळखले जाईल. साहित्य संमेलनाला आर्थिक बाबतीत कमतरता पडू नये, याची दक्षता शासनाकडून घेतली जाते. मराठी साहित्य संमेलनास गौरवाशाली परंपरा आहे. तीन वर्षांनी होणारे शंभरावे साहित्य संमेलन दिमाखात पार पडण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार आहे. प्रताप हायस्कूलमध्ये सानेगुरुजींचे सहा वर्ष वास्तव्य होते. साने गुरुजींच्या स्मारकाचा प्रस्ताव जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी तयार करावा. या प्रस्तावानुसार साने गुरुजींच्या स्मारकास येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. साने गुरुजींचे नावाप्रमाणेच भव्य स्मारक झाले पाहिजे. अशी अपेक्षाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अमळनेर मराठी वाड्.मय मंडळाच्या वतीने आयोजित ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे येथील प्रताप महाविद्यालयाच्या मैदानावर आज उद्घाटन झाले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक प्रा.डॉ.रवींद्र शोभणे सपत्नीक उपस्थित होते. उद्घाटक म्हणून माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांची उपस्थिती लाभली होती. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर,  संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, निमंत्रक तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील,  आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उद्योजक अशोक जैन, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे, समन्वयक नरेंद्र पाठक, साने गुरुजींच्या पुतणी सुधा साने आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, अमळनेर मध्ये सुरू झालेल्या अनेक गोष्टी जगात पोहचल्या आहेत. विप्रो कंपनी,  तत्वज्ञान केंद्राचा जागतिक पातळीवर नावलौकिक आहे. बहिणाबाईंनी अतिशय सोप्या भाषेत जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले आहे. राज्यात वाचनसंस्कृती वाढावी. यासाठी आम्ही शासनपातळीवर प्रयत्नशील आहे. डिजिटल युगात वाचन संस्कृती बदलली आहे. वाचनसंस्कृती टिकून राहणे. ही समाजाची गरज आहे. मराठी साहित्य संमेलनास आता डिजिटल टच देण्यात आला आहे. सामाजिक सुधारणांच्या चळवळीत साहित्य, लेखक व कलाकारांचे अमूल्य योगदान आहे. राज्याच्या विकासासाठी साहित्यिकांनी व्यक्त झाले पाहिजेत. त्यांच्या सूचनांचा निश्चितच स्वीकार केला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषा, संस्कृतीचे जतन होत असते, असेही त्यांनी सांगितले.

मराठी ही ज्ञानभाषा व्हावी,  अशी भावना सगळ्या मराठी जनतेची आहे.‌ तिला ज्ञानभाषा करण्याची जबाबदारी जशी‌ शासनाची आहे तसी आपल्या सर्वांची आहे. इंग्रजी, हिंदी आणि मराठी हा भाषाभ्यासाचा क्रम बदलून मराठी, हिंदी आणि इंग्रजी असा असावा. गाव खेड्यातील गरिबांच्या मुलांना आपल्या मातृभाषेतून शिक्षण मिळणे हा त्यांचा मुलभूत अधिकार असल्याचे मत ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र शोभणे यांनी आज येथे व्यक्त केले.

संमेलनाध्यक्ष साहित्यिक प्रा.डॉ.रवींद्र शोभणे यांनी आपल्या भाषणातून मराठी भाषा, लेखक, धर्म, संस्कृती, परंपरा व आजच्या तरूणाईचे प्रश्न याविषयी मत मांडले. ते म्हणाले की, मराठी साहित्य व भाषा टिकविण्यासाठी प्रयत्न करण्याची शासनाबरोबर वेगवेगळ्या समाजघटक, संस्थांची जबाबदारी आहे. प्रसार माध्यमांनी ही मराठी भाषा व व्यवहाराला अग्रक्रम देण्याची गरज आहे. अभिरूची वाढविणारे दर्जेदार कार्यक्रम सादर करण्याची जबाबदारी दृकश्राव्य वाहिन्यांवरील निर्मात्यांची आहे. तसे वृत्तपत्रांतून दर्जदार मजकूर देण्याचं काम संपादकांचे आहे. असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

हेही वाचा – Budget 2024 | अंतरिम बजेटमधून महाराष्ट्राला काय मिळाले, वाचा सविस्तर..

मराठी साहित्य जगताचा विचार करताना नव्या पिढीकडून आशा पल्लवित होत आहेत. आपल्या अनुभवांना वेगवेगळ्या आकृतिबंधात मांडत आपला शोध घेणारी म्हणून नवी पिढी आज काही लक्षवेधी लेखन करीत आहे. भारतीय लोकशाहीतील आधारस्तंभ असलेल्या संसद व राज्य विधानमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात साहित्य, कलावंतांची त्यांच्या राखीव जागेवर वेळोवेळी निवड होणे गरजेचे आहे. अशी‌ अपेक्षाही साहित्य संमेलनाध्यक्ष साहित्यिक प्रा.डॉ.रवींद्र शोभणे यांनी व्यक्त केली.

मराठी भाषा धोरण जाहीर करणार – दीपक केसरकर

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले की,  मराठी भाषा वेगवेगळ्या राज्यात पोहचविण्याचे काम बृहन्महाराष्ट्र मंडळांने केले आहे. तालुकास्तरावर साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी २ लाख रूपये निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या वर्षापासून शाळेत वाचनाचा तास सक्तीचा केला आहे. साहित्य पारितोषिकात शासनाचा हस्तक्षेप नसावा, ही शासनाची भूमिका आहे. साहित्याची चळवळ रूजविण्याचे काम शासनाची चार मंडळ करत आहेत. मराठी धोरण यावर्षी जाहीर करणार आहोत. लवकरच मराठी भाषा धोरण जाहीर करणार आहोत. संत साहित्य संमेलनास दरवर्षी २५ लाख देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सहा विभागात पुस्तकाचे गाव केले जाणार आहे. मुंबईमध्ये शासनाच्यावतीने मराठी भाषा भवन उभारण्यात येणार आहे. वाई गावात मराठी विश्वकोश मंडळाची भव्य इमारत बांधण्यात येणार आहे. मराठी युवक मंडळांना पाच हजारांचे अनुदान दिले जाईल. मराठी भाषेच्या विकासासाठी साहित्यिकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी दिली.

उत्तम साहित्यातून समाजसेवेचे मूल्य – उद्घाटक सुमित्रा महाजन

संमेलनाच्या उद्घाटक सुमित्रा महाजन म्हणाल्या की, काळ्या मातीला हिरवा शालू नेसवून आपल्या कवितेच्या माध्यमातून सेवा केलेले कवी ना.धो.महानोर, जीवनाचे मर्म आपल्या अहिराणी रचनेच्या माध्यमातून मांडणाऱ्या बहिणाबाई चौधरी यासारख्यांनी खान्देशचे साहित्य समृद्ध केले आहे. राजकारणातील लोकांना साहित्याचा गंध नसतो असे म्हणता येणार नाही. साहित्यातून समाजात वागावे कसे याची शिकवणूक मिळते. तळागाळातील लोकांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी राजकारण, समाजकारण केले जाते. उत्तम साहित्यातून समाजसेवेचे मूल्य मिळतात. तुमचं मन शुध्द असेल तर तुम्ही जीवनात अयशस्वी होऊ शकत नाहीत. पुस्तके जगाला जवळ आणण्याचे काम करतात.

संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, ७२ वर्षांनी जळगाव जिल्ह्यास साहित्य संमेलन आयोजनाचा मान मिळाला आहे, ही सर्व जळगाव वासियांसाठी अभिमानाची बाब आहे. जळगाव जिल्ह्याबरोबरच अमळनेर तालुक्याला साहित्याची परंपरा आहे. पुज्य साने गुरूजीच्या नगरीत होत असलेले भव्यदिव्य होण्यासाठी संमेलनास येणाऱ्‍या सर्वांना आवश्यक सोईसुविधा पुरविण्यात येत असून त्यासाठी सर्व यंत्रणा रात्रंदिवस झटत आहेत. साहित्यप्रेमींनी संमेलनास उपस्थित राहून आनंद घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

संमेलनाचे निमंत्रक तथा मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले की, अमळनेर तालुक्याला संत सखाराम महाराजांचे आशीर्वाद लाभले आहेत. साने गूरूजींची कर्मभूमी आहे. शिक्षणाचे पंढरपूर म्हणून अमळनेराचा लौकिक आहे. अमळनेरसारख्या साहित्य नगरीत संमेलन होत आहे ही अभिमानाची बाब आहे. संमेलनाच्या निमित्ताने अमळनेर शहराची शोभा वाढली आहे. साहित्यिकांच्या ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांच्या बळकटीकरणासाठी झाला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे म्हणाल्या की, जीवनाची मूल्य साने गुरुजींनी रूजवलेली आहेत. खान्देश साहित्यिक व रत्नांची खाण आहे. साहित्य संस्थांचे मराठी साहित्य व्यवहारात योगदान आहे. यावेळी प्रताप महाविद्यालयाचे मराठी भाषा विभाग प्रमुख  प्रा.रमेश माने यांनी‌ संपादित केलेल्या ‘खान्देश वैभव’ स्मरणिकेचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.‌ यावेळी साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button