नव्या वर्षात रस्ते प्रवास सुकर, मुंबई – पुणे मिसिंग लिंकसह पनवेल – इंदापूर महामार्ग सेवेत दाखल होणार

मुंबई : नवीन वर्षात, २०२६ मध्ये अनेक महत्त्वाचे रस्ते प्रकल्प वाहतूक सेवेत दाखल होणार आहेत. मुंबई – पुणे प्रवासाचा कालावधी ३० मिनिटांनी कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) खोपोली – कुसगाव दरम्यान नवीन मार्गिका अर्थात मिसिंग लिंक बाधणार आहे. या मार्गिकेचे ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून ही मार्गिका मार्च – एप्रिल २०२६ मध्ये वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. त्याचवेळी समृद्धी महामार्गावरून ठाण्यात थेट आणि अतिजलद येता यावे यासाठी एमएसआरडीसीने वडपे – ठाणे महामार्गाच्या रूंदीकरणासह काँक्रीटीकरणाचे काम हाती घेतले असून हा महामार्ग मार्च २०२६ मध्ये सेवेत दाखल करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) मुंबई – गोवा महामार्ग प्रकल्पातील पनवेल – इंदापूर टप्प्याच्या कामालाही वेग दिला आहे. हे कामही मार्चमध्ये पूर्ण करून हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल केला जाणरा आहे. तसेच एनएचएआयच्या दिल्ली – मुंबई द्रुतगती महामार्गातील तलासरी – रायते टप्प्याचे कामही येत्या काही दिवसांत पूर्ण होणार असून हा टप्पा एप्रिल २०२६ मध्ये सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २०२६ मध्ये मुंबई – पुणे, पनवेल – इंदापूर, वडपे – ठाणे आणि तलासरी – रायते रस्ते प्रवास सुकर होणार आहे.
मुंबई -ते पुणे दरम्यानचा प्रवास मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गामुळे काही तासात करणे शक्य झाले आहे. मात्र या द्रुतगती मार्गावरील वाहनांची संख्या प्रचंड वाढली असून भविष्यात यात आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे एमएसआरडीसीने खोपोली – कुसगाव दरम्यान १९.८० किमी लांबीच्या नवीन मार्गिकेचे अर्थात मिसिंग लिंकचे काम हाती घेतले. या मार्गिकेचे काम फेब्रुवारी २०१९ पासून सुरू आहे. ही मार्गिका आतापर्यंत सेवेत दाखल होणे अपेक्षित होती, मात्र या प्रकल्पाला विलंब झाला. तांत्रिक अडचणी आणि आव्हानात्मक कामामुळे प्रकल्पाला वेळ लागत असल्याचे सांगतानाच आता मात्र कामाने वेग घेतला असून ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. मिसिंग लिंक मार्च २०२६ मध्ये वाहतूक सेवेत दाखल केली जाईल, अशी माहिती एमएसआरडीसीतील सूत्रांनी दिली.
हेही वाचा – अमरावतीतील श्री अंबादेवी संस्थानास चिखलदरा तालुक्यात तीन एकर जमीन; मंत्रिमंडळ निर्णय…
मिसिंग लिंक सेवेत दाखल झाल्यास मुंबई – पुणे प्रवासाच्या वेळेत ३० मिनिटांची बचत, तर प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. नव्या मार्गिकेत घाट भाग कमी होणार असल्याने दरडी कोसळण्याची भीती दूर होणार आहे. मिसिंग लिंक नव्या वर्षात सेवेत दाखल करतानाच एमएसआरडीसीकडून मुंबई – नाशिक महामार्गावरील वडपे – ठाणे महामार्गाचे काम पूर्ण करून हा महामार्ग एप्रिल २०२६ मध्ये सेवेत दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. या २३.५ किमी लांबीच्या प्रकल्पाच्या कामाला २०१९ मध्ये सुरुवात झाली. मात्र एनएचएआयला हे काम मार्गी लावता न आल्याने एनएचएआयने एमएसआरडीसीची कंत्राटदार म्हणून नियुक्ती केली. त्यानंतर एमएसआरडीसीने कामाला सुरूवात करून कामाला वेग दिला. आतापर्यंत या प्रकल्पाचे ८१ टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पातील कशेळी आणि कळवा खाडीपूल जानेवारीपर्यंत पूर्ण करून फेब्रुवारीत सेवेत दाखल केला जाणार आहेत. तर वडपे – ठाणे दरम्यानचा संपूर्ण महामार्ग एप्रिलमध्ये सेवेत दाखल करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे. हा महामार्ग सेवेत दाखल झाल्यास मुंबई – नाशिक प्रवास अतिजलद होणार असून समृद्धी महामार्गावरून ठाण्यात पोहचणेही सोपे होणार आहे.
गेली कित्येक वर्षे रखडलेल्या आणि वादात अडकलेल्या मुंबई – गोवा महामार्गातील पनवेल – इंदापूर महामार्गाच्या कामाने वेग घेतला आहे. या टप्प्याचे ९० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले असून हा टप्पा मार्च २०२६ मध्ये सेवेत दाखल करण्यात येईल, अशी माहिती एनएचएआयमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.८४ किमी लांबीचा आणि ४५० कोटी रुपये खर्चाचा हा महामार्ग सेवेत दाखल झाल्यास पनवेल – इंदापूर प्रवासासाठी केवळ सव्वा तास लागेल. त्यामुळे हा प्रकल्प प्रवासी – वाहनचालकांच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
देशाची राजधानी दिल्ली आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबई या दोन्ही महानगरांतील प्रवास अतिजलद, केवळ १२ तासांत पूर्ण करण्यासाठी एनएचएआय दिल्ली – मुंबई द्रुतगती महामार्ग बांधत आहे. या महामार्गातील तलासरी – रायते हा शेवटचा टप्पा असून महाराष्ट्रातील या टप्प्याचे काम आता वेगात सुरू असल्याची माहिती एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी दिली. अंदाजे १५६ किमी लांबीच्या या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून एप्रिलमध्ये हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल केला जाणार आहे. हा टप्पा सेवेत दाखल झाल्यास नवी मुंबई, जेएनपीए आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे. तलासरी – रायते प्रवासही अतिजलद होणार असून पुढे मुंबई – दिल्ली महामार्ग पूर्ण क्षमतेने वाहतूक सेवेत दाखल झाल्यास मुंबई – दिल्ली प्रवास १२ तासांत करणे शक्य होणार आहे.




