‘अनेक दिवसांपासून मी जरांगेंच्या सोबत’; अंतरवाली सराटी घटनेतील आरोपीची प्रतिक्रिया

मुंबई : अंतरवाली सराठीत झालेल्या दगडफेकीप्रकरणातील आरोपी ऋषिकेश बेद्रे याला जामीन मिळाला. जामीन मिळाल्यानंतर त्याने प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्याने मनोज जरांगे यांच्याशी माझे संबंध चांगले आहेत असं म्हटलं आहे. तसेच मी शरद पवारांचा कार्यकर्ता आहे, असंही म्हटलं आहे.
ऋषिकेश बेद्रे म्हणाला, मी समाजासाठी २५ दिवस जेलमध्ये राहिलो. समाजासाठी आयुष्यभर जेलमध्ये राहिलो तरी वाईट वाटणार नाही. मी समाजासाठी गोळ्या खायला तयार आहे. अंतरवलीत लाठीचार्ज झाला. तेव्हा रक्ताने भिजलेल्या आया बहिणींना मी हॉस्पिटलमध्ये दाखल करायला गेलो होतो. मला दगडफेक झालेली माहीत नाही.
हेही वाचा – मुलांच्या शाळांची वेळ बदलली, आता ‘या’ वेळेत भरणार शाळा
धुळे सोलापूर हायवेवर जाळपोळ झाली. तेव्हा पोलिसांसोबत उभा होतो. जळपोळीत माझा सहभाग नव्हता. मी शरद पवारांचा कार्यकर्ता आहे. पण मी आंदोलनात राजकारण बाहेर ठेऊन सहभागी झालो होतो. त्यामुळे शरद पवारांचा या आंदोलनाशी संबंध नाही, असं ऋषिकेश बेद्रे म्हणाला.
मी यापूर्वी राजमाता जिजाऊची बदनामी केल्यामुळे भांडारकर इन्स्टिट्यूट फोडलं होतं. त्या प्रकारणात मी निर्दोष सुटलो आहे. मराठा आरक्षणासाठी मी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सभेत काळे झेंडे दाखवले होते. हा असा माझा इतिहास आहे. मनोज जरांगे यांच्याशी माझे संबंध चांगले आहेत. त्यांनी माझं नाव घेतलं नाही. तर काही वाटलं नाही. माझं नाव घ्यावं असं काही नाही. पण मी यापुढेही कायम मराठा समाजासाठी प्रयत्न करत राहणार आहे, असंही ऋषिकेश बेद्रे म्हणाला.





