महाविकास आघाडीतून बाहेर, शरद पवारांचा उल्लेख करत राजू शेट्टींचा खुलासा
![Raju Shetty's revelation mentioning Sharad Pawar out of Mahavikas Aghadi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/04/Raju-Shettys-revelation-mentioning-Sharad-Pawar-out-of-Mahavikas-Aghadi.jpg)
बारामती |’महाविकास आघाडी सरकारच्या धोरणाबद्दल आक्षेप नोंदवला होता. ११ फेब्रुवारीला शरद पवार, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाही पत्र लिहिले होते. शेतकऱ्यांसंबंधी अन्यायकारक निर्णयावर त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कार्यकारिणीशी बोलून महाविकास आघाडीतून बाजूला होण्याचा निर्णय घेतला आणि बाहेर पडलो,’ असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले.
‘स्वाभिमानी’च्या हुंकार यात्रेनिमित्त बारामती येथे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. शेट्टी म्हणाले, ‘महाविकास आघाडीने भूमीग्रहण कायद्यात मोडतोड केली असून, शेतकऱ्यांना याचे उत्तर द्यावे. शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबविण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. ऊस हे एकमेव हमीभाव मिळणारे पीक आहे. असाच कायदा इतर पिकांबाबत असता, तर शेतकरी त्या पिकांकडेही वळले असते. खासदार शरद पवार दहा वर्षे देशाचे कृषिमंत्री होते. त्यांनी हा निर्णय घेतला असता, तर आज परिस्थिती वेगळी असती. मात्र ते जाणीवपूर्वक ऊस आळशी माणसाचे पीक असल्याचे बोलत आहेत. ऊस उत्पादकांमुळेच त्यांच्या पुतण्या आणि नातवांचे कारखाने झाले, याचा त्यांना विसर पडला आहे.’
‘करोनाकाळात शिक्षणाचा बट्याबोळ झाला. रोजगाराचे अनेक प्रश्न निर्माण झाले. अनेकांना शिक्षण सोडावे लागले. आरोग्य विभाग, म्हाडाच्या पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. त्याकडे लक्ष देणे गरजेचे असताना विरोधक ईडी, प्राप्तिकर विभागाच्या धाडी, भोंग्यांचा प्रश्न यापुढे जायला तयार नाहीत. केंद्रातल्या अपयशावर राज्यातील विरोधक गप्प आहेत आणि राज्यातल्या प्रश्नांवरही कोणीही बोलत नाही. त्यासाठी हुंकार आंदोलन हाती घेतले आहे. त्याचा परिणाम विद्रोहात होईल,’ असा विश्वास राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. विजेबाबत कोळसा टंचाईचे देण्यात येणारे कारणच तकलादू आहे. केंद्राकडून राज्यावर खरच अन्याय होत असेल, तर मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे आपली भूमिका मांडली पाहिजे, असेही शेट्टी म्हणाले.
भाजपसोबत न जाण्याचा निर्धार
आगामी काळात भाजपसोबत जाणार का, या प्रश्नावर बोलताना ‘शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न गंभीर बनले आहेत. एप्रिल संपत आला तरी अजूनही मोठ्या प्रमाणात ऊस गाळपाविना शिल्लक आहे. एफआरपीचे तुकडे करून सरकारने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यात अनेक शेतकऱ्यांचा बळी जात आहे. शिरोळसह अन्य ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत. केंद्राच्या धोरणांमुळे रासायनिक खतांचे दर वाढले आहेत. इंधनाच्या दरवाढीमुळे मशागतीचा खर्च वाढला आहे. ज्यांनी ८०० शेतकऱ्यांचा बळी घेऊन कृषी कायदे मागे घेतले, त्यांच्यासोबत कसे जाणार,’ असे राजू शेट्टी यांनी सांगितले.