#RainAlert: मुंबई, ठाणे सह कोकणात काही ठिकाणी येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता- हवामान खाते
![101 percent of average rainfall this year; Second phase forecast released](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/RAIN1.jpg)
मुंबई: मुंबईमध्ये काल (22 सप्टेंबर) पासून धूमशान घालणारा पाऊस आता आज सलग दुसर्या दिवशी (23 सप्टेंबर) देखील बरसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज मुंबई, ठाणे सह कोकणातील काही भागांमध्येही अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी बरसण्याची शक्यता वर्तविलेली आहे. कोकण विभागामध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे तेथे 24 तासांत मुसळधार पाऊस बरसू शकतो. त्यामुळे सामान्यांनी अत्यंत गरजेचे काम असेल तरच घराबाहेर पडावे असा सल्ला देण्यात आलेला आहे.
दरम्यान नागरिकांना पाऊस आणि वार्याचा जोर पाहता खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलेले आहे. मुंबईमध्ये काल पडलेल्या पावसाने रेकॉर्डब्रेक कामगिरी केलेली आहे. मुंबई शहरातील एकूण पाऊस हा 286.4 मीमी इतका झाला आहे. हा पाऊस मागील 15 वर्षातील सप्टेंबर महिन्यातील मोठा पाऊस आहे. आज सकाळी 8.30 पर्यंत कुलाबामध्ये 147.8 मीमी तर सांताक्रुझ मध्ये 286.4 मीमी इतका नोंदवण्यात आलेला आहे.