रेडिओ क्लब जेट्टीचे २४ टक्के काम पूर्ण
मुंबईतील वॉटर टॅक्सीचे काम कधी पूर्ण होणार?
मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनानंतर लवकरच वॉटर टॅक्सी सेवा प्रवाशांसाठी खुली होणार आहे. दक्षिण मुंबईतून विमानतळापर्यंत जलमार्ग जोडणीसाठी रेडिओ क्लब जेट्टी प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. सध्या या प्रकल्पाचे सुमारे २४ टक्के काम पूर्ण झाले आहे. मे २०२६ पर्यंत संपूर्ण जेट्टी आणि टर्मिनल सुविधा कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.
गेटवे वरील ताण कमी करण्यासाठी कुलाबा परिसरात उभारली जाणारी ही अत्याधुनिक जेट्टी पर्यटक आणि प्रवाशांसाठी नवीन पर्याय ठरणार आहे. या वरून सुरू होणाऱ्या टॅक्सी सेवेमुळे कुलाबा ते नवी मुंबई विमानतळ हा प्रवास अवघ्या २० ते ३० मिनिटांत पूर्ण होणार आहे. सध्या गेटवे ऑफ इंडियावरून तीन तराफ्यांमधून ९२ फेरीबोटी सेवा देतात.
हेही वाचा : “शरद पवारांचे मानस पुत्र विजय कोलते यांनी अहिल्यांच्या जागा लाटल्या”; प्रा. लक्ष्मण हाके
साप्ताहीक सुट्ट्यांच्या दिवशी एलिफंटा व अलिबागकडे जाणाऱ्या पर्यटकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे गेटवे परिसरावरील ताण कमी करण्यासाठी रेडिओ क्लब परिसरात हा जेट्टी प्रकल्प उभारण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा प्रवास साध्य होईल.
दक्षिण मुंबईतच चेक-इनची सुविधा
सुमारे ९ कोटी प्रवाशांची क्षमता असलेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातील प्रमुख विमानतळांपैकी एक ठरणार आहे. विमानतळाचा पहिल्या टप्प्याचे उद्घाटन ८ ऑक्टोबर रोजी झाले असून, उड्डाण सेवा अद्याप सुरू झालेली नाही. विमानतळ प्रशासनाकडून रेडिओ क्लब जेट्टीवर बॅगेज व पासपोर्ट तपासणी केंद्र सुरू करण्याच्या तयारीत आहे. यामुळे प्रवाशांना दक्षिण मुंबईतूनच चेक-इन करण्याची सुविधा मिळेल.




