पाणी पुरवठा बंदचा बनावट ‘एसएमएस’ तुमचा खिसा करेल रिकामा
मेसेज मधील फाईल ओपन करू नका; पोलिसांचे आवाहन

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड मनपा पाणी पुरवठा विभाग यांच्या नावाने पाणी पुरवठा बंद करण्यात येत असल्याचे बनावट एसएमएस पाठवण्याचे प्रकार शहरामध्ये घडत आहेत. नागरिकांनी अशा बनावट एसएमएसकडे दुर्लक्ष करावे. तसेच बनावट एसएमएस पाठवणाऱ्या क्रमांकाची तक्रार सायबर पोलिसांकडे करावी, असे आवाहन पिंपरी चिंचवड मनपा आणि पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. मेसेज मधील एपीके फाईल आणि दिलेल्या नंबरवर फोन न करण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे.
पिंपरी चिंचवड मनपा कार्यक्षेत्रात सध्या ज्या मालमत्तेची पाणीपट्टी थकीत आहे, अशा मालमत्तेचे नळकनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू आहे. याशिवाय थकीत पाणीपट्टी भरण्याचे आवाहन मनपाच्या माध्यमातून ‘एसएमएस’ द्वारे व इतर माध्यमातून करण्यात येत असते. परंतु सध्या मनपाच्या पाणी पुरवठा विभागाच्या नावाने विविध मोबाईल क्रमांकावरून बनावट एसएमएस पाठवण्याचे प्रकार सुरू आहेत. अशा एसएमएसकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड मनपाच्या पाणी पुरवठा विभागाच्या नावाने प्राप्त होणाऱ्या बनावट एसएमएस बाबत तक्रार करण्यासाठी नागरिक तात्काळ जवळचे पोलीस ठाणे, सायबर पोलीस ठाणे अथवा टोल फ्री क्रमांक १९०३ यावर संपर्क करू शकतात.
हेही वाचा : पेट्रोल ऐवजी नुसते पाणीच! शहरातील पंपावरील धक्कादायक प्रकार
बँक खात्यातून पैसे काढून नागरिकांची फसवणूक
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना पाठवण्यात येणारे बनावट एसएमएस देवेश जोशी या नावाने आहेत. या एसएमएसमध्ये नमुद करण्यात आले आहे की, ‘प्रिय ग्राहक मागील महिन्यातील बिल न भरल्यामुळे रात्री ९ वाजता पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. कृपया याबाबत तात्काळ खालील नंबरवर कॉल करा.’ याशिवाय, व्हॉट्सअपद्वारे पाठवण्यात येणाऱ्या एसएमएसमध्ये एक एपीके फाईल पाठवली जात आहे. ही एपीके फाईल डाऊनलोड केल्यानंतर मोबाईल फोनमधील डेटा, बँक खात्याची माहिती, पासवर्ड अशा स्वरुपाच्या माहिती मिळवून बँक खात्यातून पैसे काढून नागरिकांची फसवणूक केल्याचे प्रकार घडत आहेत. अशा आशयाचा कोणताही एसएमएस मनपाकडून पाठवण्यात येत नसल्याने नागरिकांनी घाबरून न जाता तात्काळ असा एसएमएस येताच तक्रार करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.पालिका पाणी पुरवठा विभागाकडे संपर्क साधा
पाणीपुरवठा बंद होण्याबाबत येणारे मेसेज बनावट आहेत का, याची खात्री करा
मोबाईलवर आलेली एपीके फाईल ओपन करू नये. तसेच इतरांना शेअर करू नये
पाणीपुरवठ्याच्या प्रलंबित बिलाबाबत मनपाच्या संकेतस्थळावर माहिती घ्या.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
पिंपरी चिंचवड महानगपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या नावाने बनावट ‘एसएमएस’ वारंवार विविध क्रमांकावरुन नागरिकांना पाठवण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. नागरिकांनी फसवणूक करणाऱ्या एसएमएसकडे दुर्लक्ष करुन त्यामध्ये नमुद करण्यात आलेल्या क्रमांकावर संपर्क करू नये. तसेच बनावट एसएमएसद्वारे पाठविण्यात येणारे एपीके डाऊनलोड करू नये. बनावट एसएमएस पाठवणाऱ्यांबाबत मनपा कडून सायबर पोलिसांना माहिती देण्यात येणार आहे. नागरिकांनी देखील त्यांना बनावट एसएमएस प्राप्त झाल्यास त्याबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार करावी.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड मनपा
अशा प्रकारच्या फसवणुकीच्या प्रकारापासून सावध रहा. असा प्रकार आपल्यासोबत घडला असल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात अथवा सायबर पोलीस ठाण्यात संपर्क करा.
– संदीप डोईफोडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे)