तुझे डोळे, माझे हात, आयुष्य घालू एकसाथ!; यवतमाळमधील आगळ्या-वेगळ्या विवाहाची सर्वत्र चर्चा
![तुझे डोळे, माझे हात, आयुष्य घालू एकसाथ!; यवतमाळमधील आगळ्या-वेगळ्या विवाहाची चर्चा](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/तुझे-डोळे-माझे-हात-आयुष्य-घालू-एकसाथ-यवतमाळमधील-आगळ्या-वेगळ्या-विवाहाची.jpg)
यवतमाळ : दोघेही दिव्यांग… तो डोळ्यांनी तर ती पायांनी. योगायोगाने दोघेही एकमेकांच्या संपर्कात आले. जवळीक वाढून लग्नापर्यंत विषय पोहचला. जगण्याच्या मर्यादा आड येऊ लागल्या. पण, आत्मविश्वास आणि परस्परांवरील अतुट विश्वासाने ही अडचण सुटली. ‘तुझे डोळे, माझे हात, जीवन घालवू एकसाथ’ म्हणत दोघांनीही शुभमंगल केले. सतीश मडावी व सोनाली देवतळे यांचा हा आगळावेगळा विवाह सोहळा गुरुवारी लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयात झाला.
रोटरी क्लबच्या अध्यक्षा प्रा. डॉ. माणिक मेहरे, प्रकल्प संयोजक राजेश गढीकर, सचिव अनंत पांडे व सरिता वाधवानी यांनी आयोजनात पुढाकार घेतला. सतीश आणि सोनाली या दोघांचीही परिस्थिती बेताची. दोघांनाही पितृछत्र नाही. काही वर्षांपूर्वी सतीशच्या आईचे निधन झाल्याने तो पोरका झाला. दोन्ही डोळ्यांना दृष्टी नसल्याने शिक्षण झाले नाही. दुसरीकडे वाघापूरच्या सोनालीची परिस्थितीही याहून वेगळी नाही. वडील गेल्यावर आईने मोलमजुरी करून वाढविले. पोलिओ झाला आणि दोन्ही पाय गमावले. आईची काळजी वाढली. पण, सतीश आणि सोनाली दोघेही काही कारणाने एकत्र आले. त्यांच्यातील प्रेम बहरले. लग्नापर्यंत विषय पोहचला. याविषयीची माहिती मिळताच त्यांच्या मदतीला यवतमाळातील सामाजिक कार्यकर्ते धावून आले.
रोटरीने पुढाकार घेतला व दोघांना एकत्र विवाह बंधनात बांधण्याचा निर्णय घेतला. सतीशनेही डेली नीड्सचे दुकान टाकून चरितार्थाची सोय करण्याचे ठरविले. गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर व सुषमा तांबेकर यांनी सोनालीचे कन्यादान केले. इतकेच नव्हे तर आपल्या या मानस कन्येला भावी आयुष्यात अडचण पडू नये म्हणून पाच हजार रुपये महिना तिला देणार असल्याचे जाहीर केले. या सोहळ्याला जिल्हाधिकारी अमोल येडगे, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी, डॉ. सुरेंद्र पद्मावर, सतीश फाटक, प्राचार्य डॉ. दुर्गेश कुंटे, डॉ. विजय कावलकर, प्रदीप वडनेरकर, डॉ. प्रकाश नंदूरकर, विनायक दाते यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
.