पुनावळेकरांचा आक्रोश : प्रस्तावित कचरा डेपोविरोधात सात हजार दुचाकीस्वारांची रॅली!
प्रशासनाविरोधात संताप : मोठा प्रतिसाद; सोसायटीधारकांसह भूमिपूत्र उतरले रस्त्यावर!
![Punavalekar's outcry: Rally of seven thousand two-wheelers against the proposed garbage depot!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Punawale-Depot-Pcmc-780x470.jpg)
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्रस्तावित असलेल्या पुनावळे कचरा डेपो आरक्षण रद्द करावे आणि पर्यायी जागेत कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारावा. या मागणीसाठी परिसरातील सुमारे ७ हजार दुचाकीस्वाराची प्रचंड रॅली काढण्यात आली. साेसायटीधारकांसह भूमिपुत्रांनी या रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि प्रशासनाचा निषेध नोंदवला. एखाद्या प्रकल्पाविरोधात आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्याप्रमाणात दुचाकी रॅली काढण्यात आली. त्यामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राज्य शासनाच्या वनविभागाच्या जागेत आणि पुनावळे हद्दीत महापालिका प्रशासन कचरा डेपो उभारणार आहे. यामुळे पुनावळे, ताथवडे, मारुंजी, जांबे, हिंजवडी, लाइफ रिपब्लिक टाऊनशिप, वाकड या भागातील सोसायटीधाकर आणि रहिवाशांना मोठा फटका बसणार आहे. २००८ साली कचरा डेपोचे आरक्षण टाकण्यात आले. त्यानंतर या भागात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प आणि लोकवस्ती झाली आहे. कचरा डेपोमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार असून, जलाषयही दुषित होणार आहेत. तसेच, नागरी अरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार आहे.
या विरोधात रविवारी दुचाकी रॅली आणि चिपको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. प्रस्तावित वृक्षतोडी विरोधात झाडांना आलिंगन देऊन प्रशासनाचा निषेध करण्यात आला. पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन आणि पुनावळे रेसिडेंट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुनावळे येथे वनविभागाची २६ हेक्टर जागा आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने मागणी केल्यामुळे ही जागा महापालिकेकडे हस्तांतरित केली आहे.
कचरा डेपो हटवा…पुनावळे वाचवा…
‘सेव्ह पुनावळे’… कचरा डेपो हटवा…पुनावळे वाचवा… अशा घोषणा देत सोसयटीधारक दुचाकी रॅलीमध्ये सहभागी झाले. विशेष म्हणजे, काळ्या रंगाचे शर्ट आणि दंडावर काळी फित बांधून प्रशासनाचा निषेध करण्यात आला. कोयते वस्ती येथून रॅलीला सुरूवात झाली. त्यानंतर पुनावळे गाव, लाईफ रिपब्लिक सोसायटी, मारुंजी, विनोदेनगर, भुमकर चौक, ताथवडे, पुनावळे येथील वनीकरण या ठिकाणी रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये महिलांचा समावेश लक्षणीय होता. प्रस्तावित कचरा डेपोविरोधात सोसायटीधारकांच्या मनात असलेला संताप या निमित्ताने पहायला मिळाला.
![Punavalekar's outcry: Rally of seven thousand two-wheelers against the proposed garbage depot!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/Punawale-Depot-Pcmc-1-300x169.jpg)