‘औषधी वनस्पतीवर आधारीत प्रक्रीया उद्योग कोकणात उभे राहतील’; खा. नारायण राणे

चिपळूण : कोकणातील डोंगरदऱ्यांत मोठ्या प्रमाणात औषध वनस्पती आहेत. त्याचे शासकीय स्तरावर सर्व्हेक्षण होण्यासाठी केंद्र शासनामार्फत प्रक्रीया सुरू झाली आहे. या सर्व्हेनुसार कोकणातील औषधी वनस्पतींना औद्योगिक दृष्ट्या चालना देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगामी काळात औषधी वनस्पतीवर आधारीत प्रक्रीया उद्योग कोकणात उभे राहतील, अशी ग्वाही माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी येथे दिली. या कार्यक्रमा दरम्याने राणे यांना भोवळ आल्याने सुरक्षा रक्षकांच्या मदतीने त्यांना खुर्चीत बसविण्यात आले. मात्र, त्यांच्या या प्रकृत्ती अस्वास्थामुळेच “आता वयोमानानुसार थांबायला हवे,” असे सिंधुदुर्गात केलेले सूचक विधान खरे ठरण्याची शक्यता वर्तविली जावू लागली आहे.
वाशिष्ठी डेअरीच्या वतीने शहरातील बहादूरशेखनाका येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात ५ ते ९ जानेवारी दरम्यान कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी खासदार राणे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन झाले. यानिमीत्त आयोजित शेतकरी मेळाव्यात खासदार राणे म्हणाले, पुर्वी कोकणी तरूण नोकऱ्यांसाठी मुंबई पुण्यात धाव घ्यायचा. मात्र, आता कोकणात गरिबी राहिलेली नाही. कोकणात रोजगाराची साधने वाढली असून कोकण विकासाकडे झेप घेत आहे. हा कृषी महोत्सव पाहून थक्क झालो. वाशिष्ठीचे चेअरमन प्रशांत यादव कोकणा विकासासाठी योगदान देत आहेत, असे ही सांगितले.
हेही वाचा – प्रभाग क्रमांक ८ मध्ये भाजपच्या अधिकृत सर्व उमेदवारांना मतदान करा!.
वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव म्हणाले, कोकणातील भौगोलिक परिस्थिती, पारंपरिक व्यवसाय आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करून वाशिष्ठी डेअरी सुरू केली. गेल्या तिन वर्षात ७ ते ८ हजार शेतकरी या प्रकल्पाशी जोडले गेले. येथे दररोज ५५ हजार लिटर दूध संकलन केले जाते आणि १३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर दर दहा दिवसांनी थेट पैसे जमा केले जातात. काजू व फळपिक योजनांच्या माध्यमातून १२२ शेतकऱ्यांना शासन व बँक यंत्रणेशी जोडण्याचे काम सुरू आहे. या महोत्सवातून किमान १०० ते २०० शेतकरी स्वयंपूर्ण व्हावेत, हा हेतू असल्याचे यादव यांनी स्पष्ट केले.
यावेळी प्रगतशील शेतकरी व बागायतदारांचा काजू कलम व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास चिपळूण नागरीचे संस्थापक अध्यक्ष सुभाष चव्हाण, माजी आमदार सदानंद चव्हाण, डॉ. विनय नातू, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव, जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, युवानेते अनिरूद्ध निकम यांच्यासह पदाधिकारी ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
महोत्सवात १५ ते २० गुंठ्यांवर प्रत्यक्ष ‘लाईव्ह डेमो शेती’ उभारली आहे. चार जनावरांच्या दुग्धव्यवसायासोबत कुक्कुटपालन, शेळीपालन, भाजीपाला व फळबाग लागवड केल्यास शेतकऱ्याला दरमहा ३० ते ३५ हजार रुपयांचे शाश्वत उत्पन्न कसे मिळू शकते, याचे प्रात्यक्षिक येथे दाखवले आहे.
वाढते वय आणि कामाचा व्याप यामुळे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर नारायण राणे हे भाजपचे कोकणातील प्रमुख चेहरा आहेत. अशा वेळी त्यांची प्रकृती बिघडणे आणि त्यांनी निवृत्तीचे संकेत देणे, यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे सावट आहे. “आता वयोमानानुसार थांबायला हवे,” असे केलेले सूचक विधान खरे ठरण्याची शक्यता कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे.




