पिंपळे निलखमध्ये रंगला सुर नवा ध्यास नवाचा आवाज
कै. ज्ञानोबा चोंधे प्रतिष्ठान आणि यशश्री महिला संस्थेच्या वतीने दिवाळी पहाट उत्साहात
![Pimple Nilakh, Rangala Sur Nava Dhyas Nava, Voice,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/pimple-nilakh-780x470.jpg)
पिंपरी: प्रभात समयो पातला, आता जागवा विठ्ठला…सुर नवा ध्यास नवा यासह विविध मधूर गाण्यांनी दिवाळी पहाटचा कार्यक्रम पिंपरीत रंगला. दिवाळीच्या सुरूवातीलाच आयोजित या कार्यक्रमामुळे नागरिकांनीही आनंद घेत कार्यक्रमात सहभागी झाले. कै. ज्ञानोबा चोंधे प्रतिष्ठान आणि यशश्री महिला संस्था प्रायोजित दरवर्षीप्रमाणेच वसुबारसच्या शुभमुहूर्तावर सुरेल संगीत दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले. यंदाचे हे 16 वे वर्ष होते. विजया वाणी, निरजा गोवर्धन, नंदिनी आकुज, नरेंद्र शास्त्री, गिरीश पाठक व अजित धामणकर या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
या वेळी सारेगमप फेम संज्योती जगदाळे हिने गोड आवाजात बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जिवेभावे गायले. लिटल चॅम्प छोट्या आरंभीने, नाम आहे आदी अंती नाम सार.. तल्लीन होऊन म्हटले. तुषार रिठे यांनी नादातुन या नाद निर्मितो श्रीराम जयराम जय जय राम म्हणत वातावरण नादमय केले. संज्योती जगदाळे हिने आम्हां नकळे ज्ञान नकळे पुराण हे भक्ती गीत सादर करत वातावरण भक्तीमय केले. तुषार रिठे यांनी मुसाफिर हुं यारो म्हणत उपस्थितांच्या मनाचा ठाव घेतला. यासह आओ हुजुर तुमको सितारोंमें ले चलु, बाहोंमें चले आओ, झिलमिल सितारोंका आंगण होगा, क्या हुवा तेरा वादा, कजरा मोहब्बतवाला..आदीसह विविध गाणी सादर करत वातावरण प्रफुल्लीत केले.
दीपावली निमित्त अॅम्युनिशन फॅक्टरीचे अध्यक्ष संतसेवक शामराव केदारी यांचा किर्तन महोत्सव 2024 आणि लगोरी असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी राजु गोसावी यांना या वेळी विशेष सन्मानित करण्यात आले. पिंपळे निलख मधील नॅशनल गेममध्ये उत्तम कामगिरी केलेल्या सुकन्या शर्वरी कामठे, प्रणिता सरोदे, तपस्वी नवघण, वैष्णवी कांबळे, नम्रता वाघ यांचा सत्कार करुन कौतुक केले.
सैराट चित्रपटातील झिंगाट या गाण्यावर उपस्थित थिरकले. या गाण्याने व अल्पोपहाराने दिवाळी पहाटची सांगता झाली. सुत्रसंचलन महेश गायकवाड यांनी केले. नितीन खंडागळे, अमित कुंटे, संतोष पवार,ऋतुराज कोरे,सागर रिठे, अभिजित यादव या वाद्यवृंदाने साथसंगत केली. भाजपा युवा मोर्चाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संकेत चोंधे यांनी दिवाळीनिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. माजी नगरसेविका आरती चोंधे यांनी आभार मानले.