#PatilVsMahadik: ‘चांगल्या गोष्टीत खोडा घालायला मी पाटील नाही, मी महाडिक आहे’
![#PatilVsMahadik: 'I don't want to undermine good things, I am Mahadik'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/Patil-vs-Mahadik.jpg)
कोल्हापूर | ‘चांगल्या गोष्टीत खोडा घालायला मी पाटील नाही, मी महाडिक आहे’, अशी टीका गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी पालकमंत्री आणि राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील च्यावर केली. देवस्थानच्या जमिनी लाटल्याचा आरोपही त्यांनी केल्या. महाडिक या भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी असून त्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षाही आहेत. आज पत्रकार परिषदेत त्यांनी गोकुळच्या कारभारावर टीका करताना दूध उत्पादकांसोबत सत्ताधाऱ्यांकडून झालेल्या विश्वासघाताची वर्षपूर्ती असल्याचा आरोपही त्यांनी केला.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळच्या सत्तात्तरास एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वर्षपूर्ती गोकुळच्या प्रगतीचा आढावा घेताना गोकुळचे नेते सतेज पाटील यांच्यावर आरोप केले. जानेवारी २००२ ते मार्च २०२२ या कालावधीत गोकुळमधील दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत कमालीची घट झाली असल्याचे त्यांनी कागदोपत्री स्पष्ट केले. पालकमंत्री सतेज पाटील विरोधात असताना सातत्याने ‘ग्राहकांवर दरवाढ न लादता दूध खरेदी दरात वाढ करा’, अशी मागणी करायचे. पण पालकमंत्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या संचालक मंडळाने ग्राहकांवर चार ते सहा रुपये दरवाढीचा बोजा टाकून दूध उत्पादक शेतकऱ्याला दोन ते तीन रुपयांची वाढ दिली आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले.
संचालक महाडिक म्हणाल्या, काटकसर करुन दरवाढ देतो म्हणणाऱ्या पालकमंत्र्यांनी खरी लूट माजवली आहे. कोल्हापूर वगळून इतर जिल्ह्यात आधी दूध विक्री दरात वाढ केली पण कोल्हापूर उत्तरची निवडणूक दूध दर वाढ करण्याचा अर्थ काय असा सवाल त्यांनी केला. निवडणूक झाल्यानंतर दरवाढ ग्राहकांवर लादली हे कळण्याइतकी कोल्हापूरची जनता दुधखुळी नाही, असेही त्या म्हणाल्या.
सर्वसाधारणसभेत माजी आमदार महादेराव महाडिक का उपस्थित राहणार, अशी टीका करणारे पालकमंत्री गोकुळच्या सर्वसाधारण सभेस का उपस्थित राहतात? असा सवाल केला. महाडिक म्हणाल्या, महाडिकांवर टीका करत तुम्हीही तसेच वागता. महाडिकांची बदनामी करत त्याचा सत्ता मिळवण्यासाठी वापर केला. महाडिक गोकुळमधील कारभारात कधीच हस्तक्षेप करत नसत. त्यांच्या काळात लोकशाही पद्धतीने कारभार केला जात होता. आमच्यावर आरोप करणाऱ्या पालकमंत्री पाटील यांनी ‘देव मेला’, म्हणून देवस्थानच्या जागा हडपल्या. त्यांनी हडपलेल्या जमिनीचा हिशोब घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा करण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.