‘पंढरपूर वारी’चा जागतिक प्रवास सुरू : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

कोयनानगर : महाराष्ट्राच्या संत परंपरेचा गजर करणारी पंढरपूर वारी आता जागतिक स्तरावर पोहोचणार आहे. “परदेशी पर्यटकांसाठी ‘वारी अनुभव योजना’ सुरु केली जाणार आहे.”, असे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी जाहीर केले. योजनेच्या माध्यमातून आषाढी वारीचा दिव्य अनुभव आता परदेशातील पर्यटकांनाही प्रत्यक्ष घेता येणार आहे.
राज्य पर्यटन विभाग या योजनेतून विशेष टूर पॅकेज, भाषांतर व मार्गदर्शक सुविधा, वारकरी वेशभूषेतील स्वागत, भोजन व निवास व्यवस्था यांची आखणी करणार आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील अध्यात्म, एकात्मता आणि सांस्कृतिक वारसा जागतिक व्यासपीठावर नेण्यात मदत होणार आहे.
हेही वाचा – ‘कोल्हापुरातील शाहू जन्मस्थळाचे लवकरच लोकार्पण’; मंत्री आशिष शेलार
शंभूराज देसाई म्हणाले, “वारी केवळ धार्मिक यात्रा नाही. ती एक सामाजिक संस्कार शाळा आहे. जगाने ती अनुभवली पाहिजे, हा आमचा उद्देश आहे.” पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही योजना आषाढी वारी २०२५ पासून प्रत्यक्ष अंमलात येणार आहे.