TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गोकुळमधील संचालक वाढीचा निर्णय हुकुमशाहीचं लक्षण; पृथ्वीराज चव्हाण यांचा सरकारवर हल्लाबोल

निवडून आलेल्या संचालकांचे अधिकार काढून आपल्या मर्जीतील लोकांना बसवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप; ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनालाही चव्हाण यांचा पाठिंबा.

सातारा : गोकुळ दूध संघातील संचालकांची संख्या वाढवण्याच्या निर्णयावरून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. गोकुळमध्ये कायदा बदलण्याची प्रक्रिया ही हुकुमशाही आणि दादागिरीचं लक्षण असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनालाही त्यांनी पाठिंबा दर्शवला.

गोकुळमधील निर्णयावर पृथ्वीराज चव्हाणांचा आक्षेप

गोकुळबाबतचा निर्णय हा सरळसरळ हुकुमशाहीचा आणि दादागिरीचा प्रकार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं. निवडून आलेल्या प्रतिनिधींचे अधिकार काढून घेऊन आपल्या विचारांच्या लोकांना संस्थेत बसवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. आर्थिकदृष्ट्या उत्तम चालणाऱ्या संस्थेवर जबरदस्तीने कब्जा करण्याचा हा प्रयत्न असल्याचंही ते म्हणाले.

या निर्णयाला लोक सहन करतील की नाही, हे सांगता येत नाही. यावर न्यायालयीन लढाई होऊ शकते; मात्र शेवटी सरकारची भूमिका महत्त्वाची ठरेल, असं मतही चव्हाण यांनी व्यक्त केलं.

निवडणूक प्रक्रियेवरही सरकारवर निशाणा

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत घडलेल्या घटनांचा उल्लेख करत चव्हाण यांनी सरकारवर टीका केली. निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता, मतदार यादीतून मोठ्या संख्येने मतदारांची नावे वगळल्याचा आरोप, ईव्हीएम आणि गोकुळमधील कायद्यातील बदलाची प्रक्रिया, या सगळ्या गोष्टी हुकुमशाहीची लक्षणं असल्याचं ते म्हणाले.

लोकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची गरज

जेन-झीने ज्या प्रकारे विरोध करून सरकारला नमवलं, त्याचप्रमाणे लोकांनीही आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची गरज असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. लोकांनी तीव्र विरोध केला नाही, तर गोकुळसारख्या सहकारी संस्था आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आंदोलनं सरकार दडपून टाकेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा –  शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणी सुरू

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनात आपण सहभागी झाल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्यामुळे त्यांच्या आंदोलनाला यश मिळाल्याचंही त्यांनी नमूद केलं.

दुष्काळी परिस्थिती, वाढती महागाई आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे शेतकरी अडचणीत असल्याचं ते म्हणाले. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य मोबदला मिळत नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

गोकुळमधील निर्णय असो किंवा शेतकऱ्यांचं आंदोलन, लोकांनी आपल्या हक्कांसाठी तीव्र आंदोलन केलं नाही, तर सरकार कोणाचीही दखल घेणार नाही. त्यामुळे हुकुमशाही अधिक कडक होत जाईल, असा इशाराही पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group