सर्वसामान्यांना कांदा रडवणार मात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळणार!
![Onion will make common people cry but farmers will get relief](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/Onion-780x470.jpg)
Onion : गेल्या काहीदिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. मात्र आता शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण आता कांद्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. दर्जेदार कांद्याच्या दरात सप्टेंबर महिन्यात दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच कांद्याच्या दरात वाढ झाल्यास कांदा उत्पादकांना याचा चांगला फायदा होणार आहे.
व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरपर्यंत कांद्याच्या किंमतीत जवळपास दुप्पट वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजे कांद्याचे दर हे ५५ ते ६० रुपये प्रति किलोवर जातील अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. देशात सध्या कांद्याचा पुरेसा साठा आहे. मात्र बराचसा कांदा खराब झाला आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीचा कांदा महाग होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा – आमदार महेश लांडगे यांचे वाढते ‘‘पॉलिटिकल मायलेज’’
तसेच नाशिकमध्ये कांद्याचे घाऊक भाव ५ रुपये प्रति किलो ते २४ रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. तर किरकोळ बाजारात कांद्याचे दर हे २५ ते ३५ रुपये प्रति किलो वर गेले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचा दर हे स्थिर होते. मात्र सध्या कांद्याच्या दरामध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री लागणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.