breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

आमदार महेश लांडगे यांचे वाढते ‘‘पॉलिटिकल मायलेज’’

पिंपरी-चिंचवडच्या परिघाबाहेर सीमोल्लंघन करणारा पहिला स्थानिक नेता

पिंपरी । विशेष प्रतिनिधी

भोसरी विधानसभेतील आमदार महेश लांडगे हे पिंपरी-चिंचवडसह संपुर्ण राज्यातील तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्याला निमित्त होते विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचे. औरंगजेबाचे उदात्तीकरण होत असल्याबाबत आमदार अबू आझमी यांच्यावर आ. लांडगे यांनी संताप व्यक्‍त करत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी दाखवलेले प्रेम तरूणांना प्रेरणादायी ठरले. यासह शहरात वेस्ट टू एनर्जीसह राबविलेले विविध उपक्रम आणि त्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली दखल कौतुकास्पद आहे.त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण राज्यात आमदार लांडगे यांचे ‘‘पॉलिटिकल मायलेज’’ वाढत असल्याचे चित्र आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भोसरी विधानसभेत बलाढ्य नेता असणाऱ्या तसेच पिंपरी-चिंचवडमधील ‘राजकीय चाणक्‍य’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी आमदार विलास लांडे यांचा पराभव करत आमदार लांडगे यांनी विधानसभेत आपली ‘दमदार एन्ट्री’ केली. त्यावेळी मारलेल्या मुसंडीची पुणे जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा झाली होती. प्रचंड मोदी लाटेत लांडगे अपक्ष निवडणूक लढवित मिळविलेले भरघोस मताधिक्‍क्‍याने विजयी झाले होते. तेव्हापासून आमदार लांडगे यांनी मागे वळून पाहिले नाही. या मतदारसंघात दुसऱ्यांदा मतदारांनी त्यांना भरघोस मतांनी विजयी केले.

मतदारसंघाचे प्रतिनिधीत्त्व करत असताना राज्याने आदर्श घ्यावा, असे प्रकल्प राबविण्यासाठी ते आग्रही राहिले आहेत. त्यासाठी जागतिक स्तरावरील कबड्डी, कुस्ती क्रीडा संकुलाच्या निर्मितीसाठी त्यांनी पाठपुरावा केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि बहुउद्देशीय क्रीडा संकूल उभारणीसाठी त्यांनी पाठपुरावा सुरू केला आहे.

पिंपरी-चिंचवड शहराचा गेल्या ३० वर्षांपासून प्रलंबित असलेला कचरा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार लांडगे यांनी कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा अनोखा उपक्रम त्यांनी आपल्या मतदारसंघात सुरू केला. त्यामुळे पर्यावरणाची हानी टळणार आहे. तसेच नागरिकांची कचऱ्यापासून मुक्‍तता होणार आहे. कचऱ्यापासून वीज निर्मिती करणारा हा राज्यातील पहिला प्रकल्प ठरला आहे. या प्रकल्पाचे नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्धाटन झाले. त्यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी या प्रकल्पाचे कौतुक केले. त्यामुळे ‘‘पिंपरी-चिंचवड मॉडेल’’ ची चर्चा राज्यासह परराज्यातही होवू लागली आहे.

हेही वाचा – सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? अमोल कोल्हे कडाडले

पिंपरी-चिंचवड शहरात अनेक मातब्बर नेते निर्माण झाले. यामध्ये स्व. अण्णासाहेब मगर, माजी आमदार ज्ञानेश्‍वर लांडगे, स्व. अंकुशराव लांडगे, प्रा. स्व. रामकृष्ण मोरे, स्व. लक्ष्मण जगताप, विद्यमान खासदार श्रीरंग बारणे, माजी आमदार विलास लांडे यांची नावे अग्रक्रमाने घ्यावी लागतील. मात्र, स्व. रामकृष्ण मोरे यांच्यानंतर शहराचे नेतृत्व राज्याच्या राजकारणात करण्याची संधी एकाही स्थानिक नेत्याला मिळाली नाही. स्व. लक्ष्मण जगताप आणि माजी आमदार विलास लांडे हे प्रचंड क्षमता असलेले नेते होते. मात्र, शहरावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा एकछत्री अंमल राहिला. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराचे निर्णय अजित पवार यांच्याच अधिकारात झाले. मात्र, २०१७ पासून स्व. लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी शहराचे निर्णय घेण्यास सुरूवात केली. दुर्दैवाने मुरब्बी नेते जगताप कालवश झाले. अन्य नेत्यांनीही आपले राजकीय वलय निर्माण केलेच. मात्र, त्यांचे वलय केवळ पिंपरी-चिंचवड शहरापुरेतेच सीमित राहिल्याची वस्तूस्थिती आहे. आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या अनेक उल्लेखनीय उपक्रमांमुळे, विधानसभेत उपस्थितीत केलेल्या मुद्‌द्‌यांमुळे ते राज्याच्या प्रभावशाली नेतृत्त्वाच्या यादीत बसले. त्याला विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताकद दिली, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

महापुराच्या वेळी पश्‍चिम महाराष्ट्राच्या जनतेला आधार…

दोन वर्षांपूर्वी पावसाळ्यात पश्‍चिम महाराष्ट्राला पुराचा मोठा वेढा होता. अनेक कुटुंब उद्धवस्त झाली होती. नागरिकांच्या घरात पाणी जाऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. या वेळी आमदार लांडगे यांनी धान्य, दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंचे ट्रक भरून पश्‍चिम महाराष्ट्राकडे पाठविले. नागरिकांना आधार देण्याच्या त्यांनी हाती घेतलेल्या ‘एक हात मदतीचा’’ उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक झाले.

बैलगाडा शर्यतीच्या न्यायालयीन लढ्याचे सूत्रधार…

बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्याला यश देखील मिळाले. ज्या वेळी बैलगाडा शर्यत बंदी होती. त्या वेळी सांगलीतील आटपाडीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी बैलगाडा शर्यतीचे मोठ्या प्रमाणात आयोजन केले होते. पोलिसांनी तिथे जाण्याला बंदी घातली होती. या वेळी वेशभूषा बदलून वाट काढत आमदार महेश लांडगे यांनी या कार्यक्रमाला लावलेली उपस्थिती सर्व माध्यमासह राज्यभरात चर्चेचा विषय ठरला. यापुढे बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवण्याबाबत अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या पुढाकाराने न्यायालयीन लढाई सुरू झाली. त्याचे खरे सूत्रधार आमदार लांडगे राहिले आणि ही लढाई त्यांनी जिंकली. विशेष म्हणजे, भारतातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत भरवून लांडगे राज्यातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले आहेत.

छत्रपतींशी निष्ठा..अन्‌ विधानसभेतील गाजलेले भाषण…

नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात महामानवांच्या अवमानबाबत सुरू असलेल्या चर्चेत समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी वादाला तोंड फोडले. त्यानंतर आमदार नितेश राणे आणि आमदार महेश लांडगे यांनी आझमी यांना धारेवर धरले. ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो..मग, औरंग्याला कशाला गळ्याला लावतो…’’ अशी प्रचंड आक्रमक पवित्रा घेणारे आमदार लांडगे यांच्या व्हीडिओचे स्टेटस महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले. शिव-शंभू प्रेमींनी राजकीय अभिनिवेश न ठेवता लांडगे यांच्या भूमिकेचे स्वागत केले. दुसरीकडे, छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वांत उंच पुतळा अर्थात ‘‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’’ पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्याचे काम लांडगे यांनी हाती घेतले आहे. त्यामुळे लांडगे यांची चर्चा महाराष्ट्रातील घरांघरांत होवू लागली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button