हिंदूंनी पारंपारिक कपडे घालावेत आणि इंग्रजी बोलू नये; मोहन भागवत यांचं वक्तव्य चर्चेत

Mohan Bhagwat | हिंदू धर्मातील लोकांनी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पारंपरिक कपडे घालावेत आणि इंग्रजी भाषेत बोलू नये. धर्म हा हिंदूंचा आत्मा असून, प्रत्येकानं त्याचं वैयक्तिकरीत्या पालन करायला हवं, असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलं आहे. केरळच्या पठाणमथिट्टा जिल्ह्यातील पंपा नदीच्या काठावर बुधवारी (५ फेब्रुवारी) हिंदू धार्मिक परिषदेचा भाग म्हणून हिंदू एकता परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मोहन भागवत उपस्थित होते.
मोहन भागवत म्हणाले, की एकजूट असलेला समाज भरभराटीला येतो; तर विखुरलेला समाज कोमेजून जातो. धर्म हा हिंदूंचा आत्मा असून, प्रत्येकाने त्याचं वैयक्तिकरीत्या पालन करायला हवं. हिंदू धर्मातील प्रत्येक कुटुंबानं किमान आठवड्यातून एकदा एकत्र येऊन प्रार्थना करावी आणि त्यांची सध्याची जीवनशैली परंपरेनुसार आहे का यावर चर्चा करावी. आपण बोलत असलेली भाषा आणि आपले कपडे हिंदू परंपरेशी जुळतात का याचाही विचार करायला हवा.
हेही वाचा : प्रस्तावित ‘‘शिवनेरी’’ जिल्हाच्या मागणीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार- आमदार महेश लांडगे आमने-सामने!
हिंदूंनी आपापल्या स्थानिक भागात फिरायला हवं आणि आपल्या बांधवांची भेट घेऊन, त्यांना मदत करायला हवी. त्याचबरोबर आपण इंग्रजी भाषेत बोलू नये आणि आपले स्थानिक खाद्यपदार्थच खायला हवेत. सार्वजनिक कार्यक्रमाला जाताना हिंदू बांधवांनी पारंपरिक कपडे घातले पाहिजेत. पाश्चात्त्य पोशाख घालू नयेत, असंही मोहन भागवत म्हणाले.