विधानसभा अध्यक्षांच्या नावाने आमदार जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा, मी त्यांना थांबवलं: जयंत पाटील
![MLA Jitendra Awha's resignation in the name of Assembly Speaker, I stopped him: Jayant Patil](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/Jayant-Patil-1-700x470.png)
- विधानसभा अध्यक्षांच्या नावाने जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा
- ते राजीनामा घेऊन तिकडे निघालेच होते, पवारांशी चर्चा केली
- मी त्यांना अडवलं, सांगलीहून त्यांना समजवायला आलो : जयंत पाटील
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
ठाण्याच्या पोलिसांनी कोणत्या गाईडलाईन्स तपासून जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला? हे त्यांनी सांगावं. राजकारण होत राहील. पण पोलिसांनी अशा पद्धतीने वागावं हे अमान्य आहे. पोलीस जर अशा पद्धतीने वागत असतील तर त्यांना येत्या काळात आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. पोलीस प्याद्याप्रमाणे वागतात, हे स्पष्ट दिसतंय. आम्ही या सगळ्या प्रकरणावर सरकारला जाब विचारु. पण मुख्यमंत्र्यांसमोर हा प्रकार घडल्याने त्यांनी याप्रकरणी हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं. घडलेल्या प्रकाराने आव्हाड अतिशय व्यतित झालेत. खालच्या पातळीच्या राजकारणाने टोक गाठलंय. यातूनच त्यांनी राजीनामा दिला. मी शरद पवार यांच्याशी बोललोय, आम्ही आव्हाडांची समजूत काढतोय, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आव्हाडांच्या समर्थनार्थ आणि पक्षाची बाजू मांडण्यासाठी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. आव्हाड यांनी हर हर महादेव चित्रपटाविरोधात भूमिका घेतल्याने त्यांच्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केले जातायेत. पण शिवरायांच्या इतिहासाचं विकृतीकरण करण्यांविरोधात आमचा लढा सुरु राहिल. आव्हाडांच्या भूमिकेला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे, असं जयंत पाटील म्हणाले. तसेच ठाण्यात मुख्यमंत्री शिंदे विरुद्ध जितेंद्र आव्हाड असं चित्र निर्माण होतंय. यात आव्हाडांना ठाण्याच्या जनतेचा मोठा पाठिंबा आणि सहानुभूती मिळतेय. असं असताना आव्हाडांविरोधात जाणून बुजून खोटे गुन्हे दाखल केले जात असल्याचं जयंत पाटील म्हणाले.
आव्हाडांची कृती विनयभंगाच्या कुठल्या व्याख्येत बसते? मुख्यमंत्र्यांदेखल हे सगळं घडलंय. त्यांनी याप्रकरणी हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. आव्हाडांनी व्यतित होऊन राजीनाम्याचा निर्णय घेतला. विधानसभा अध्यक्षांच्या नावाने त्यांनी राजीनामा दिलाय. तो राजीनामा माझ्याकडे मी घेतलाय. याविषयी पवारांसाहेबांशी मी चर्चा केली. मी सांगलीहून तत्काळ आव्हाडांची समजूत काढण्यासाठी मुंबईत आलो. त्यांची समजूत काढली. पण राजकारण खरंच जर एवढ्या खालच्या पातळीला जाणार असेल तर सगळ्यांनीच विचार करायला हवा, असं जयंत पाटील म्हणाले.
जितेंद्र आव्हाड राजीनामा घेऊन तिकडे निघाले होते. पण त्यांनी याप्रकरणी राजीनामा देऊ नये, अशी माझी भूमिका होती. मी त्यांना समजावलं, पवारसाहेबांशी चर्चा केली. याप्रकरणी मी अजूनही त्यांच्याशी चर्चा करेन, असं जयंत पाटील म्हणाले.
दुसरीकडे खुनाचा गुन्हा चालला असता पण विनयभंगाचा गुन्हा मान्य नाही. माझ्यावरचा गुन्हा हा षडयंत्राचा भाग आहे, असा थेट आरोप करतानाच विनयभंगाचा गुन्हा आयुष्यात कधी केला नाही. राजकारणात आक्रमकपणाने बोललो असेल, एखाद्याच्या शब्दश: अंगावर गेलो असेल पण परस्त्री मातेसमान हे तत्व कळायाल लागल्यापासून जपलंय, असं आव्हाड म्हणाले.