राज्यात पाऊस परतणार! हवामान खात्याने ‘या’ जिल्ह्यांना दिला ‘यलो अलर्ट’
![Meteorological department has given 'yellow alert' to 'these' districts.](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Maharashtra-rain-780x470.jpg)
पुणे : देशात मान्सूनवर यंदा अल निनोचा प्रभाव दिसून आला. यामुळे ऑगस्ट महिन्यात पाऊस झाला नाही. जुलै महिन्यातील पावसाने काहीसा दिलासा दिला. पावसाळ्याचे तीन महिने संपले असताना राज्यातील धरणे भरलेली नाही. यामुळे आता सप्टेंबर महिन्यात कसा पाऊस पडणार? यावर यंदाची परिस्थिती अवलंबून आहे. अशातच हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. यामुळे पाच सप्टेंबरपासून उत्तरपूर्व भारत, मध्य प्रदेश, महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होणार आहे. ४ ते ७ सप्टेंबर दरम्यान कोकणातील काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्रात ५ ते ७ सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे. मराठवाड्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा – मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा; म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत २ दिवसांत निर्णय घ्यावा, अन्यथा..
पुणे परिसरात पुढील ४८ ते ७२ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडात आजपासून पावसाचा यलो अलर्ट पुढील चार दिवस देण्यात आला आहे. गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, अकोला, यवतमाळ, वर्धा, अमरावती, बुलढाणा, लातूर, नांदेड, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.