‘गोवंश हत्या करणार्यांवर मकोका लावणार’; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची घोषणा

मुंबई : राज्यात गोवंशहत्या करणार्यांवर मकोका लावणार असून वारंवार गुन्हे करणार्यांना १० वर्षेची तरतूद असेल यासाठी कायद्यात सुधारणा देखील करणार आहोत. राज्यात अनधिकृत पशूवधगृहे असतील, तेथे विशेष मोहीम घेऊन कारवाई केली जाईल, अशी घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी विधानसभेत केली. गोवंशियांची हत्या कोणत्याही प्रकारे सहन केली जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपचे आमदार संजय उपाध्याय यांनी बदलापूर पश्चिम येथे झालेल्या गोहत्येविषयी विधानसभा नियम – १०५ नुसार लक्षवेधी उपस्थित केली होती. ९ जून २०२५ रोजी अंबरनाथ येथील मोहल्ल्यात पहाणी करण्यास गेल्यावर पोलिसांना बंदीस्त शेडमध्ये गोवंशिय हत्या होत असल्याची माहिती मिळाली. कैफ मन्सूर शेख याच्या घरामागील पत्रा शेडमध्ये ५०० किलो गोमांस आढळून आले. याकडे उपाध्याय यांनी लक्ष वेधले.
हेही वाचा – भारत-ब्रिटन व्यापार करार अंतिम टप्प्यात; पुढील आठवड्यात होणार औपचारिक घोषणा
उत्तरात गृहराज्यमंत्री कदम म्हणाले, मन्सूर शेख याच्यावर १२ गुन्हे नोंद असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर तडीपारीची कारवाई करणार आहोत. गोवंश रक्षणाचे कार्य करणार्यांना ओळखपत्रे दिली जातील. ज्या संस्था, संघटना गोवंश संगोपनासाठी गोशाळा चालवत आहेत, त्यांना बळ देण्यासाठी प्रयत्न केले जातील. आमदार अतुल भातखळकर, अमोल खताळ यांनी प्रश्नांची विचारणा केली.




