जगातील सर्वोत्तम ५० न्याहरीच्या यादीत महाराष्ट्राची मिसळ-पाव चमकली!

Tasteatlas breakfast ranking | खाद्यपदार्थांबाबत मार्गदर्शन करणाऱ्या विख्यात ‘टेस्ट अटलास’ने जाहीर केलेल्या जगभरातील सर्वोत्तम ५० न्याहरीच्या पदार्थांच्या यादीत भारतातील तीन व्यंजनांनी स्थान पटकावले आहे. यामध्ये महाराष्ट्राची चटकदार मिसळ-पावने १८ वा क्रमांक मिळवत सर्वांचे लक्ष वेधले आहे. याशिवाय, भारतीय पराठा २३ व्या आणि दिल्लीतील प्रसिद्ध छोले भटुरे ३२ व्या क्रमांकावर आहेत.
‘टेस्ट अटलास’ने जून २०२५ च्या या जागतिक क्रमवारीत स्थानिक संस्कृती आणि चवीला प्राधान्य देत ही यादी तयार केली आहे. जगभरातील नागरिक आपल्या दिवसाची सुरुवात या पदार्थांनी करतात, असे या यादीत नमूद करण्यात आले आहे. मिसळ-पावने भारतीय खाद्यसंस्कृतीचे प्रतिनिधित्व करत १८ व्या स्थानावर झेप घेतली आहे, तर पराठा आणि छोले भटुरे यांनीही आपल्या अनोख्या चवीने जागतिक पातळीवर भारताचा झेंडा फडकवला आहे.
हेही वाचा : आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून ५ हजार २०० विशेष बसेस सोडणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
महाराष्ट्रातील मिसळ-पाव हा मसालेदार आणि चटकदार पदार्थ असून, त्याच्या खास चवीमुळे तो देश-विदेशात लोकप्रिय आहे. या यादीत स्थान मिळाल्याने भारतीय खाद्यसंस्कृतीच्या समृद्धीचा आणि विविधतेचा जागतिक स्तरावर पुन्हा एकदा दाखला मिळाला आहे.