ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महापुरुषांच्या अवमानाची विकृत ‘फॅशन’!

देशातील करोडो जनता ज्यांना मानते, ज्यांची भूमिका, ज्यांचा दृष्टिकोन समोर ठेवून त्यांच्या पावलावर पाऊल टाकते, त्या महापुरुषांच्या अवमानाची सध्या फॅशन बनली की काय ? असं वाटू लागलं आहे. हे महापुरुष म्हणजे अनेकांची दैवतं असतात, याचं भान देखील विटंबना करणाऱ्या किंवा अवमान करणाऱ्याला नसतं, ही खरी दुर्दैवाची गोष्ट आहे. पूर्वी, हे होत होतं, पण आज काल अवमानाची ही ‘फॅशन’ थेट संसदेमध्ये पोहोचली आहे, याचं जास्त वाईट वाटतं !

म्हणतात ना.. वाईट किंवा चांगल्या अर्थानं प्रसिद्धी मिळणं, याला हल्ली महत्त्व दिलं जातं. कुणी अर्वाच्य बोलून प्रसिद्धी मिळवतं, तर कुणी सरकारवर सतत खालच्या थराची टीका करून प्रसिद्धीच्या झोतात राहतं. काही विचारवंत किंवा आमची माध्यमं त्याला ‘जीभ घसरली’ असं म्हणून वेळ मारून नेतात. कोणी शब्दच्छल करत ‘पॅशन’ आणि फॅशन या दोन शब्दांभोवती पिंगा घालतं..!

काँग्रेसच्या दृष्टीनं विचार केला तर स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यांचं कायमचं अवमान करण्याचं हत्यार आहे. त्याचप्रमाणं, डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा छत्रपती शिवराय यांचा अवमान करण्याची संधी देखील अनेक राजकारणी सोडत नाहीत. त्यातून त्यांना शिव्या मिळतात तो भाग वेगळा, पण किमान आठ दिवस तरी संपूर्ण मीडियामध्ये त्यांचं नाव गाजत असतं, हे लक्षात घ्यायला हवं ! एखाद्या सुंदरशा प्रसंगात अथवा भाषणात या महापुरुषांच्या संदर्भात कोणी चांगलं बोलत असेल, तर त्याकडं दुर्लक्ष करायचं, आणि त्या भाषणातला एक शब्द घेऊन त्याचे उलट सुलट अर्थ लावायचे, अशा नेत्यांचा सर्वत्र सुळसुळाट झाला आहे, हे सर्वांच्याच लक्षात आलं असेल. संसदेमध्ये गृहमंत्री अमितभाई शाहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात सुंदर भाषण केलं, पण ते जे बोलले नव्हते, ते त्यांच्या तोंडी घालून विरोधकांनी संपूर्ण देशभर थयथयाट केला. काँग्रेस नेते तर नेहमीच स्वातंत्र्यवीरांचा अपमान करतात. किंबहुना, वारंवार अचूक संधी शोधून ते घाव घालतात. राहुल गांधी सारख्यांना स्वातंत्र्यवीरांची शौर्यगाथा माहित सुद्धा नसेल, पण, महाराष्ट्र दौऱ्यावर आल्यानंतर सावरकरांविषयी वाईट बोलले नाहीत, तर ते राहुल गांधी कसले ?

दुर्दैवी प्रसंग परभणीचा..
संविधानाचा अवमान करण्याची घटना नुकतीच परभणीत घडली आणि संपूर्ण देश त्या मुद्द्यावर पेटून उठला. परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीचा अपमान करण्यात आला. यानंतर परभणी जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंद दरम्यान, आंबेडकरी अनुयायांनी रस्ता रोको करत काही भागांत दगडफेक केली तसेच तसेच टायर जाळले. यावेळी पोलीस प्रशासन ‘अॅक्शन मोड’ वर होते. एकूणच सगळीकडील कलुषित वातावरण पाहता परभणीमधील इंटरनेटची सुविधा खंडित करण्यात आली. त्या ठिकाणी जमावबंदी जाहीर करण्यात आली. हिंसक घटनांमुळे अमरावती शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, मुळात राष्ट्रपुरुषांची स्मारके, प्रतिमा, संदर्भातील वास्तू यांचे प्राणपणाने जतन करणे, हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. आजच्या काळात राष्ट्रपुरुषांच्या कार्याची, विचारांची आपण कधीही बरोबरी करू शकत नाही, त्यांच्याइतकी वैचारिक उंची आपण गाठू शकत नाही, त्यांचे कार्य लौकिक अथनि अलौकिक असेच असते. पण, समाजातील विघातक अपप्रवृत्ती, नराधम मात्र कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी, समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्यासाठी, समाज व्यवस्थेमध्ये वादंग पसरविण्यासाठी असे कृत्य करून आसुरी आनंद मिळवत असतात, पण ही एक प्रकारची विकृती आहे, हे त्यांना समजावून कोण सांगणार?

एक गोष्ट लक्षात घ्या,या विकृतांच्या आसुरी आनंदाची समाजव्यवस्थेला फार मोठी किंमत मोजावी लागते, झालेली हानी भरून निघते, पण समाजामध्ये निर्माण झालेली तेढ, भावनिक जखमा भरून निघण्यास अनेक वर्षे निघून जातात. भारतीय समाज हा संवेदनशील व भावनाशील आहे. त्यात भारतामध्ये विविधतेतून एकता हे पालुपद वारंवार आळविले जात असले, तरी हे वाक्य सुभाषित म्हणून केवळ भिंतीवरच आजच्या काळात शोभून दिसते, तशा अर्थाचे वागणे मात्र कोणाकडे दिसत नाही. विविध जातीधर्मियांचा भारतात समावेश असला, तरी भारतीय समाज आजही जाती-धर्माच्या चौकटीतच अडकला असून बंधनातच विखुरला गेला आहे. त्या जातीधर्माच्चौकटी तोडून तो आजही देशाचा, देशाच्या अखंडतेचा विचार करत नाही, ही वास्तवता असली तरी खऱ्या अथनि ती एक शोकांतिकाच आहे.

राष्ट्रपुरुषांची देखील वाटणी केली
आमची शोकांतिका काय आहे? राष्ट्रपुरुषदेखील आम्ही भारतीयांनी जातीधर्मात वाटून घेतले आहे. त्यामुळे राष्ट्रपुरुषदेखील जातीधर्माच्या चौकटीत बंदिस्त झाले आहेत. किंबहुना, राजकीय फायदा उठवण्यासाठी अनेकांना ते जाती-धर्मातच बंदिस्त हवे आहेत !

भारताची राज्यघटना ज्यांनी लिहिली, ते राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देखील मागासवर्गीय एक-दोन जातीपुरतेच सीमित झाले असल्याचे वातावरण आज निर्माण झाले आहे. मुळातच डॉ. बाबासाहेब अबिडकर यांचे कार्य व जीवनपट पाहता प्रत्येक भारतीयांचे या विचारपर्वाचे देव्हाऱ्यांमध्ये देवाबरोबर पूजन केले पाहिजे, त्यांचे स्मरण केले पाहिजे. पण, त्यांनाही जातीच्या वेष्टनाचा विळखा पडल्याने डॉ. आंबेडकर आजच्या समाजाला समजू शकले नाहीत. महात्मा ज्योतिबा फुले हे माळी समाजाचे, छत्रपती शिवाजी महाराज मराठा समाजाचे, लोकमान्य टिळक ब्राह्मण..असे जातीचे लेबल महापुरुषांना लावण्यात आले. मुळात महापुरुषांना जाती-धर्माच्या चौकटीमध्ये अडकवून ठेवण्याचा आम्हाला कोणी अधिकार दिला?

राजकीय स्वार्थासाठी षडयंत्रे
महापुरुषांच्या स्मारकांची विटंबना, त्यांच्याशी संबंधित साहित्याची अथवा वस्तूची विटंबना ही नक्कीच संवेदनशील व अक्षम्य बाब आहे. अशी निंदनीय घटना करणारा विकृत कोणत्याही जातीचा-समाजाचा असो, त्याला कदापि माफी मिळू नये. अशा घटना घडवून आणण्यामागे कोणाचे तरी षडयंत्र असते. समाजात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा, जातीय दंगली व्हाव्यात, जाती-जातींमध्ये वाद निर्माण व्हावेत, हा हेतू अशा घटना घडवून आणण्यामागे त्या अपप्रवृत्तींचा असतो. त्यांच्या याच कुटिल खेळीला आपण बळी पडतो, हे मात्र आपले दुर्दैव.. आणि यातूनच त्या विकृत नराधमांचा हेतू साध्य होतो.

मुळातच अशा घटना घडल्यानंतर सर्वप्रथम आम्ही भारतीयांनी थंड डोक्याने अशा घटनांचा आढावा घेऊन शोध घेतल्यास त्या नराधमांना धडा शिकविणे अवघड जाणार नाही. अशा घटना घडताच आपण संयम व सहनशीलता गमावून बसतो व त्यातूनच उद्रेक जन्म घेतो. जमावाला डोके नसते आणि रागाला विचार करता येत नाही. अशाच घटनांना यातून खतपाणी नकळत घातले जाते. राष्ट्रपुरुषांची स्मारके पुन्हा उभारली जातील, पण समाजव्यवस्थेचे रागाच्या भरात झालेले नुकसान पुन्हा भरून येणे शक्य नाही. राष्ट्रपुरुषांच्या कार्याचे व विचारांचे संवर्धन झाल्यास आपला समाज नजीकच्या काळात नक्कीच सुजलाम सुफलाम होईल. मुळातच राष्ट्रपुरुषांचे कार्य, त्यांचा जीवनपट आजही अनेकांना माहिती नसतो, केवळ तो कोणीतरी मोठा माणूस आहे आणि आपल्या समाजाचा आहे व अशा घटनांतून आपल्या समाजाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा विचार डोक्यात ठेवून समाज रस्त्यावर उतरतो. मुळातच राष्ट्रपुरुषांना विशिष्ट जातीधर्माच्या चौकटीत बंदिस्त करण्याचे पातक आम्ही करत आहोत, असा विचार प्रत्येकाने केला पाहिजे.  एखादा कृत्य करतो, परंतु राष्ट्रपुरुषांना, त्यांच्या कार्याला, जीवनपटाला विशिष्ट जातीधर्माच्या चौकटीत बंदिस्त करण्याचे पातक आम्ही वर्षानुवर्षे करत आहोत. आम्हीही तितकेच दोषी आहोत, हे नव्या पिढीला समजावून सांगायला हवे. अशा घटनांना पायबंद बसणे काळाची गरज आहे. घटना घडल्यावर उद्रेक न करता शांतपणे विचार करून संयम दाखविल्यास गुन्हेगारांना धडा शिकविणे सोपे जाते व समाजाचे नुकसानही टळू शकते.

राष्ट्रपुरुषांची विटंबना करणे किंवा अवमान करणारे शब्द उच्चारणे, ही विकृती ठेचण्यासाठी सरकारने कायदे आणखी कडक करायला हवेत. या कायद्यांची जरब सुद्धा प्रचंड हवी, जेणेकरून ते कृत्य करण्यापूर्वी शिक्षेची दाहकता संबंधितांना लागायला हवी. अशा प्रकारची विकृती समाजात फोफावत चालली आहे, आणि त्यातून मार्ग काढण्याचे अवघड आव्हान केंद्र आणि राज्य सरकारांवर आहे. अर्थात दोन्ही ठिकाणी सध्या भारतीय जनता पार्टी प्रणित युतीचे सरकार सत्तेवर आहे, त्यामुळे समन्वयाने मार्ग काढून, कायदे कठोर आणि कडक करून ही विकृती मात्र ठेचायला हवी, एवढीच छोटीशी सूचना !

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button